नवी दिल्ली
मोदी सरकारच्या काळात देशात गहू खरेदीत वाढ झाल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्विट द्वारे दिली आहे. २०१४ पासून देशात आतापर्यंत ४३ टक्क्यांनी गहू खरेदी वाढली आहे, असंही तोमर म्हणालेत.
२००५ ते २०१४ मध्ये १ हजार ९७२ लाख मेट्रीक टन गव्हाची खरेदी होती. यात वाढू होऊन ही खरेदी २०१४ ते २०२३ पर्यंत २ हजार ८११ लाख मेट्रीक टन झाल्याचेही तोमर म्हणाले आहेत.
देशात गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे सरकारकडून दरवर्षी गव्हाची आधारभूत किमतीने खरेदी केली जाते. पण यंदा अतिवृ्ष्टीचा आणि उष्णतेचा गव्हाला फटका बसला आहे. मात्र कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षीपेक्षा यावर्षी गहू खरेदीत वाढ झाली आहे.
मागील वर्षी पंजाब आणि हरियाणा राज्यात गहू खरेदीत मोठी वाढ झाली आहे. खरेदीनंतर शेतकऱ्यांना तात्काळ पैसे देण्यात आले होते. सध्या गव्हाची आधारभूत किमत २ हजार १२५ रुपये आहे.
भारताकडून गहू आयातीच्या हालचाली?
भारतात निर्माण झालेला गव्हाचा तुटवडा भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्र सरकार रशियाकडून गहू आयात करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे देशात गव्हाचा साठा वाढून गव्हाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकार सरकारी सौद्यांद्वारे रशियाकडून ९ दशलक्ष टन गहू आयात करण्याचा विचार करत आहे. भारतीय ग्राहक घाऊक गव्हाची किंमत बुधवारी ६.२ टक्क्यांनी वाढून २४८० रुपये प्रति क्विंटल वरून २६३३ झाली आहे. तसंच गव्हाची आयात करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा देखील सुरु झाल्या आहेत.
Share your comments