Chief Minister Devendra Fadnavis News
पुणे : आज महाराष्ट्राची ५० टक्के लोकसंख्या ५०० शहरात आणि उर्वरित लोकसंख्या ४० हजार गावात राहते आहे. शहरांचा चेहरा आपण बदलू शकल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन देऊ शकतो. यासाठी ‘पुणे अर्बन डायलॉग’ सारखे मंथन आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
यशदा, बर्वे चॅरिटेबल ट्रस्ट, इंटरनॅशनल सेंटर आणि पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने यशदा येथे आयोजित ‘पुणे अर्बन डायलॉग-आव्हाने आणि उपाय’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, विजय शिवतारे, बापुसाहेब पठारे, हेमंत रासने, माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा संपूर्ण विकास आराखडा रद्द करून पहिल्यांदा रस्त्यांचे जाळे निर्माण करायचे आणि नगर रचना योजनांचा उपयोग करण्याचा विचार आहे. आज आपण पीएमआरडीएच्या माध्यमातून भविष्यातील पुणे असलेले नवीन शहर अथवा वसाहत तयार करत असताना मोठे रस्ते आवश्यक आहेत. त्याचबरोबर नागरी वाहतूक महत्त्वाचा विषय असून महानगर एकीकृत वाहतूक प्राधिकरण तयार करण्यात येत आहे. प्रवासाच्या शेवटापर्यंत वाहतुकीची सुविधा मिळावी हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे उद्दीष्ट हवे.
मुंबईमध्ये एकच तिकिटावर उपनगरी रेल्वे, मेट्रो, मोनो आणल्या असून वॉटर टॅक्सीदेखील त्यात उपलब्ध असतील. यात कोणत्याही व्यक्तीला प्रवासाच्या आराखडा ज्यात त्याच्या २०० मीटरवरून प्रवासाची साधने आणि गंतव्य स्थानापर्यंतचे प्रवासाचे पर्याय मिळतील. याची पहिल्या टप्प्यात पुढच्या ६ महिन्यात मुंबईत अंमलबजावणी होणार असून पुढे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात होणार आहे.
पुढील काळात मार्गांचे मॅपिंग करणार असून त्यासाठी गुगलसोबत करार करत आहोत. त्यातून सिग्नलचे सिमुलेशन करून वाहतूक व्यवस्थापन करण्यात येणार आहे. पुण्यात पीएमपीएमएल बस व्यवस्थेला मेट्रोचे जोड देऊन वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मेट्रोला फिडर सेवा करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. पुण्यात त्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (पुम्टा) तयार केले आहे.
Share your comments