भारतात गेल्या काही महिन्यापासून पेट्रोल डिझेल च्या किमतीत खुप वाढ झाली आहे. पेट्रोल डिझेल च्या ह्या आसमानी किमतीमुळे महागाई खुपच मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या महागाईमुळे मध्यमवर्गीय माणसांचे पार कंबरड मोडून गेले आहे. आणि ह्या महागाईचा मार शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात बसत आहे. कृषी कार्यात उपयोगी पडणारे अनेक उपकरणे ही डिझेलवर चालतात. त्यामुळे शेतीसाठी होणारा खर्च हा किती तरी पटीने वाढला आहे आणि ह्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट घडून येत आहे.
शेतकरी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे खुप त्रस्त झाला आहे. पण आता कर्नाटकच्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कर्नाटक सरकार आता त्यांच्या शेतकऱ्यांसाठी एक प्लॅन बनवत आहे, त्यानुसार आता कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल वर चक्क सबसिडी मिळणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, कृषी कार्यात उपयोगी येणाऱ्या वाहणाला तसेच उपकरणांना लागणाऱ्या पेट्रोल डिझेल वर सबसिडी देण्याचा विचार सरकार करत आहे आणि ह्यावर कर्नाटक सरकार लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
'ह्या' योजनेचा मिळणार शेतकऱ्यांना फायदा
टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, कर्नाटकचे कृषिमंत्री बी.सी.पाटील यांनी म्हटले आहे की, सरकार शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या डिझेल-पेट्रोलवर प्रति लिटर 20 रुपये सबसिडी देण्याच्या योजनेवर काम करत आहे. ही योजना लागू झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भारतात सध्या पेट्रोल व डिझेल शंभरीचा आकडा पार करून चुकले आहे. महाराष्ट्रात देखील हा आकडा शंभरी पार आहे. महाराष्ट्रातील मालेगावात पेट्रोल 111.50 रुपये प्रति लिटर तर डिझेल 100 रुपये च्या आसपास मिळत आहे. सध्या कर्नाटकात पेट्रोलची किंमत सुमारे 110 रुपये प्रति लीटर आहे. ही किमत वेगवेगळ्या जिल्ह्यात तसेच भागात वेगवेगळी आहे पण साधारण हा आकडा शंभरी पार आहे. त्याचबरोबर कर्नाटकात डिझेल 100 रुपये प्रति लिटर मिळत आहे. एका कार्यक्रमात बोलताना कर्नाटकचे कृषिमंत्री बी.सी.पाटील म्हणाले की आम्ही लवकरच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी या विषयावर बोलणार आहोत आणि ह्या योजनेची लवकर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहोत.
शेतकऱ्यांना ह्या महागाईमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्यामुळे सरकार शेतकऱ्याच्या समस्या जाणुन त्यांना सोयीचे होईल असे पाऊल उचलण्यासाठी प्रतिबध्द आहे. ह्या योजनेनुसार, कृषी कार्यात वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर 20 रुपये अनुदान देण्याचा विचार आहे. जर ही योजना अमलात आली तर ह्यातून शेतकऱ्यांना खुप मोठा फायदा होणार आहे. ह्या योजनेची अंमलबजवणी झाली तर निश्चितच शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन येतील असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
Share your comments