मधुमक्षिका आणि माणूस यांचा एक वेगळा ऋणानुबंध आहे. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात की, जगातील शेवटची मधमाशी मरण पावल्यानंतर 4 वर्षांच्या आत मानव प्रजाती पृथ्वीवरून नामशेष होईल. बदलत्या वातावरणीय परिस्थितीत कदाचित तो दिवस दूर नाही अशी मानवची वागणूक सुरु आहे. या सर्व सद्यस्थितीत मधमाशी वाचवणे यासाठी खूप कमी मंडळी काम करत आहेत त्यातील एक श्वेता वायाळ-गायकवाड.
वडील शेतकरी आणि आई शिक्षिका अशा सामान्य परिस्थिती असलेल्या सर्वसाधारण कुटुंबात श्वेताचा जन्म झाला. जसे सर्वसाधारण मुलं शिकतात त्याचप्रमाणे तिचाही एका गावात शिक्षण सुरू होतं पुढे कृषी शिक्षणासाठी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, नारायणगाव (पुणे) येथे तीने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि तिच्या जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली.
कृषि शिक्षण घेत असताना सुरवातीला इतर विद्यार्थी वर्गासारखी स्पर्धा परीक्षा करावे हि मानसिकता तिची देखील होती पण कृषि क्षेत्रातील संधी पाहता तीने नवा मार्ग निवडला तो म्हणजे कृषिपूरक व्यवसायाचा. शेवटच्या वर्षाला असताना महाविद्यालयीन प्रकल्प म्हणून श्वेताने मधुमक्षिका हा विषय निवडला. सुरवातीला मधुमक्षिका क्षेत्रात काम करणारे शाश्वत प्रकल्प शोधण्यास तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. पुढे एका संपर्कातून तीने मधुमक्षिका क्षेत्रातील तज्ञ मा. विजय महाजन यांच्याकडे प्रकल्प आणि अनुभव घेण्यास सुरवात केली. प्रशिक्षण आणि अनुभव घेताना पडेल ते काम तीने केले त्यामुळे तिला अनुभव येत गेला. तब्बल सहा महिने जिद्दीने प्रशिक्षण पूर्ण केले.
सुरवातीला भांडवलाची कमी असल्याने तिला शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करावी लागली. पण नोकरी करत असताना आपल्याला मधुमक्षिका क्षेत्रातचं कारकीर्द करायची हे मात्र मनाशी पक्के केले होते. भारत सरकारच्या केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, (CBRTI) पुणे येथील संशोधक वर्गाच्या सातत्याने संपर्कात राहून विविध प्रशिक्षणाचे टप्पे देखील पूर्ण केले. पुढे याचं संस्थेच्या माध्यमातून तीने देशभर विविध शेतकरी आणि उद्योजक यांच्यासाठी ट्रेनिंग घेतले आहे. आजपर्यत देशभरातील सात पेक्षा जास्त राज्यात श्वेता शेतकरी बांधवांसाठी प्रशिक्षण घेत आहेत.
प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना मधु उत्पादनांची मागणी होऊ लागल्याने ‘मधुलेह’ हा ब्रांड रजिस्टर करून देशभर या उत्पादनांची विक्री करत आहे. मधुमक्षिका क्षेत्रात भविष्यात ट्रेसीबिलीटी सारखे जागतिक तंत्रज्ञान वापरून ग्राहकांना शुद्ध आणि दर्जदार मध देण्याचा तिचा मानस आहे. मधुमक्षिका क्षेत्रातील योगदानासाठी तिला केंद्र शासनाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे.
Share your comments