नारायणगाव: ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल फार्मर्स 2020 या परिसंवादात मधुमक्षिका पालन तंत्रज्ञान या परिसंवादाचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव येथे आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न श्री. अनिलतात्या मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रकाश पाटे, कार्यवाह श्री. रवींद्र पारगावकर, सौ. मोनिकाताई मेहेर, श्रीजित फूड्स प्रा.लि.चे संचालक श्री. ऋजित मेहेर, केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे, सौ. निवेदिता शेटे, श्री. योगेश यादव तसेच जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर तालुक्यातील मधुमक्षिका पालक शेतकरी तसेच महिला बचत गटातील महिला, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कृषि विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी परिसरामध्ये आढळणार्या मधुमक्षिका, त्यांचे प्रकार, त्यांचे मानवी जीवनातील महत्व तसेच मधुमक्षिकांचा वापर करून शेतकर्यांच्या उत्पादनात कशाप्रकारे वाढ होईल यासाठी शेतकर्यांनी काय करावे असे सांगितले. या परिसंवादात शेतीतील मधमाशांचे महत्त्व तसेच परागीभवनातील मधमाशांचे महत्त्व याविषयीचे मार्गदर्शन करताना मधुमक्षिकांचा उपयोग फक्त मधासाठी न होता शेतकर्यांसाठी परपरागीकारणासाठी होतो त्यामुळे फळधारणा होण्यासाठी मदत होऊन पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी मदत होते असे विशद गोवा येथील मधुमक्षिका तज्ञ श्री. महादेव गावकर यांनी उपस्थित महिला शेतकरी व शेतकऱ्यांना केले.
लुधियाना पंजाब कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र प्रमुख डॉ. पि. के छुनेजा यांनी ग्रामीण भागातील मधमाशी पालन हा एक पूरक व्यवसाय याविषयी मार्गदर्शन केले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, मध माशीपालनातून मधाव्यतिरिक्त मेण, रॉयल जेली, पराग इ. पदार्थ मिळू शकतात व त्यापासून शेतकर्यांना चांगल्या प्रकारे आर्थिक फायदा होऊ शकतो. तसेच ग्रामीण भागातील महिला व युवकांना हा व्यवसाय कमी खर्चामध्ये चालू करता येतो. श्रीजित फूड्स प्रा.लि.चे संचालक श्री. ऋजित मेहेर यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, मधासाठी बाजारपेठेविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काळवाडीच्या सरपंच सौ. अंजली वामन या उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सहअध्यक्ष म्हणून ग्रामोन्नती मंडळाचे संचालक श्री. एकनाथ शेटे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार सौ. निवेदिता शेटे गृहविज्ञान विषय तज्ञ यांनी केले.
Share your comments