राज्यात डाळिंबाची लागवड विशेष उल्लेखनीय आहे, पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, नाशिक, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यात याची लागवड नजरेस पडते. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीच्या अनुषंगाने डाळिंब लागवडीकडे आपला मोर्चा वळवला होता, मात्र आता या तालुक्यातील शेतकरी पिन होल बोरर या किडीच्या प्रादुर्भावामुळे संकटात आला आहे, तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर डाळिंबाच्या बागाच तोडण्याची नामुष्की ओढावून आली आहे.
आटपाडी तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून डाळिंबाच्या बागा जोपासत आहेत, मात्र गेल्या काही वर्षात आटपाडी तालुक्यात डाळिंब पिकावर तेल्या आणि मर रोगाचा मोठा प्रादुर्भाव नजरेस पडत होता. तालुक्यातील जिगरबाज शेतकऱ्यांनी तेल्या व मर रोगासारख्या भयंकर रोगावर नियंत्रण प्राप्त करून आतापर्यंत डाळिंब पिकवला होता. परंतु आता तालुक्यातील डाळिंबांच्या बागावर पिन होल बोरर नामक ग्रहण चाल करून आले आहे. या किडीच्या प्रादुर्भावामुळे डाळिंबाची झाडे पिवळी पडतात व त्यानंतर या किडीने ग्रसित झाडे संपूर्ण वाळतात. ज्या डाळिंबाच्या बागेत या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे त्या बागेतील ताई डाळींबाचे झाडे पिवळी पडली आहेत तर काही डाळिंबाची झाडे पूर्णतः सुकून गेली आहेत. मागील दोन-तीन वर्षापासून डाळिंब बागेवर मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे मात्र तालुक्यातील शेतकरी या संकटाचा सामना करत आतापर्यंत कसेबसे उत्पन्न पदरी पाडत होता.
तालुक्यातील नेलकरंजी येथील रहिवाशी शेतकरी धोंडीराम भोसले देखील आतापर्यंत मर रोगाचा सामना करत त्यावर नियंत्रण मिळवित डाळिंबाच्या बागेतून कसेबसे उत्पन्न प्राप्त करत आले आहेत. परंतु आत्ता धोंडीराम यांची डाळिंबाची बाग पिन होल बोरर या किडीमुळे संपूर्ण पिवळी पडत आहे. धोंडीराम यांनी आपल्या जवळपास दोन एकर क्षेत्रावर सुमारे 650 डाळिंबाची झाडे लावली आहेत. या संपूर्ण बागेवर आता या किडीचे सावट नजरेस पडत असून यामुळे धोंडीराम यांची मोठी आर्थिक हानी होत आहे. धोंडीराम यांनी सांगितले की, पिन होल बोरर या किडीच्या प्रादुर्भावामुळे त्यांना त्यांची दीड-दोन एकरावरील डाळिंबाची बाग उपटून फेकण्याची नामुष्की ओढवून आली आहे. भोसले यांच्या डाळिंबाच्या बागेवर या हंगामात चांगला बहार आला होता, मात्र या किडीच्या प्रादुर्भावामुळे हा सर्व बहार मातीमोल झाला आहे. शिवाय या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने भोसले यांना आपली डाळिंबाची बाग तोडावी लागणार आहे.
पिन होल बोरर ही कीड डाळिंबाच्या खोडावर आक्रमण करत असते, यामुळे डाळिंब खोडाला छिद्रे पडतात आणि त्यातून भुसा बाहेर पडत असतो. यामुळे डाळिंबाची पाने पिवळी पडू लागतात, तसेच बहार आलेले डाळिंब हळूहळू गळू लागतात. भोसले यांच्या डाळिंबाच्या बागेची जशी परिस्थिती आहे तसेच परिस्थिती तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बागेवर असल्याचे सांगितले जात आहे. तालुक्यातील जवळपास 40 ते 50 टक्के डाळींब बागा या किडीच्या प्रादुर्भावामुळे क्षतीग्रस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले जात आहे.
Share your comments