1. बातम्या

सावधान! आक्रमणकारी किड महाराष्ट्राच्या उंबरट्यावर; होऊ शकते नुकसान

Pradip Balaso Bhapkar
Pradip Balaso Bhapkar


रोज बदलते वातावरण आणि त्या बदलत्या वातावरणात शेतीसाठी येणारी रोजची नवीन आव्हाने, त्यामुळे शेती करणे शेतकऱ्याला दिवसेंदिवस अवघड होत चाललेलं आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये अवकाळी पाऊस आणि नवीन किडींचा प्रादुर्भावाने शेतकरी जास्त त्रस्थ आहे. या आपत्तीमधून होणारे नुकसान शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यासाठी येणाऱ्या काळात जी परस्थिती आहे, त्यापेक्षाही भयानक संकट शेतकऱ्यांच्या शेतीवरती येऊ शकते किंवा येऊ पाहते आहे, तर काही भागात याचा शिरकाव देखिल झाला आहे, ते संकट म्हणजे टोळधाड. आत्ता ही टोळधाड  म्हणजे अजून काही नवीन? असा नक्कीच प्रश्न पडला असणार, कारण मागच्या वर्षी लष्करी आळीने मक्याच्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. आता त्याहून या टोळधाडी चे स्वरूप भयानक आहे आणि यासाठी आपण शेतकरी बांधवांनी तयारीत असले पाहिजे. नागपूर आणि वर्ध्यात तर संकटाने शिरकाव केला असून तेथील शेतकऱ्यांना पिकांची चिंता पडली आहे. दरम्यान  या संकटाशी दोन हात करण्याआधी आपण याचा थोडा इतिहास बघू.       

काय आहे टोळधाड?

            अफ्रिकन देशांमधून सुरू झालेल्या या टोळधाडीला इंग्रजी मध्ये Locust म्हटलं जातं. हे  ओर्थोपटेरा ऑर्डर मधील किटक आहे. १२ प्रकारच्या छोट्या शिंगांमधील एक कीटक या टोळधाडी मध्ये आढळून येतो. वाळवंटी प्रदेशामध्ये प्रामुख्याने या किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. सरासरी दोन ग्राम वजन असलेली  ही कीड साधारण स्वत:च्या वजना एवढे खाद्य खाते त्याचबरोबर या किडीचे प्रजनन झाल्यानंतर वाळूमध्ये हजारो अंडी घालण्याची सवय असते.  त्यामुळे आफ्रिकन देशांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. १३० कि.मी पर्यंत रोजचा प्रवास करण्यची क्षमता असलेले किटक प्रजनन, स्वतःच्या सुरक्षेसाठी व अन्नाच्या शोधात एका ठिकाणाहून  दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असतात.

दमट वातावरण या किडीच्या प्रजननासाठी अनुकूल असते. २७ वर्षापासून आफ्रिकन, अरबी तसेच अलीकडच्या काळात पाकिस्थान मध्ये या किडीने अक्षरशः धुमाकूळ घातला  आहे,  पण मागच्या वर्षी पासून या टोळधाडीने भारताकडे मोर्चा वळवला आहे, त्यामध्ये राजस्थान, गुजरात राज्यामध्ये काही ठिकाणी शेतीच नुकसान केले आहे. यावर्षी मध्य प्रदेश मधील भोपाल आणि त्या शेजारील भागांमध्ये या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तर राज्यातील काही भागात या टोळधाडीने प्रवेश केला आहे.  सातपुडा पर्वत मार्गे महाराष्ट्रातील संत्रा उत्पादक मोर्शी तालुक्यात धडक दिली आहे.  त्यामुळे भाजीपालक उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसानही झाले आहे. अजून किती आणि कशा पद्धतीने ही टोळधाड नुकसान करेल याची चिंता शेतऱ्यांना लागली

 आहे.

 

टोळधाड आल्यानंतर घ्यावयाची काळजी-

  • टोळधाडीच्या आक्रमणावर सरकारी यंत्रणा लक्ष ठेवून आहेच शिवाय शेतकऱ्यांना त्या बद्दल सजगही केलं जात आहे.
  • टोळधाड बागांना तसेच इतर पिकांना नुकसान करणार, त्यासाठी आपल्या बागेत या किडीला थांबून न देता थाळीचा आवाज करून, ढोल-स्पीकर वाजवून, फटके फोडून, धूर करून, घाण कडवट वासाचे स्प्रे घेऊन आपल्या पिकापासून दूर ठेवता येते.
  • रासायनिक औषधांमध्ये क्लोरोपायरीफॉस २० % ई.सी १२०० एम.एल, डेल्टामेथ्रीन २.८ % ई.सी ६२५ एम.एल, डायप्लूबेन्जूरॉन २५ % डब्लू.पी १२० ग्राम. लेम्डासायलोथ्रीन ०५ % ४०० एम.एल, मेलाथिऑन ५० % ई.सी १८५० एम.एल यामधील कोणतेही एक औषध ५००-६०० ली. पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
  • ही टोळधाड रात्री ६.०० ते ८.०० वाजण्याच्या सुमारास आगमन करते आणि सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रस्थान करते, त्यासाठी पहाटे ३.०० ते ७.३० च्या आधी वरील औषधांची फवारणी करून घ्याची आहे जेणे करून ही टोळधाड पुढे जाण्यापासून रोकता येईल.
  • टोळधाडी च्या झुंडी दिसून आल्या तर शेतकऱ्यांनी लगेच प्रशासनाला माहिती द्यायची आहे, त्याबरोबर योग्य प्रशिक्षण घेऊन कीड नियंत्रणात आणली जाऊ शकते.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters