युक्रेन युद्धामुळे जगभरातील कमोडिटीजच्या किमतीत वाढ झाली. भारतालाही याचा फायदा झाला असून तुम्ही म्हणाल, रशियाकडून कमी दरात इंधन घेतलं की, परंतु नाही ही बाब शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची आहे, कमोडिटीजमध्ये वाढ झाल्यानं बासमती निर्यातीच्या किमतीतही वाढ झाली. याचा परिणाम म्हणून एप्रिल ते मे दरम्यान भारताने निर्यात केलेल्या बासमतीचे (Basmati Export) मूल्य १३ टक्क्यांनी वाढले आहे.
चालू आर्थिक वर्षात या दोन महिन्यात भारताने बासमती निर्यातीच्या माध्यमातून ६९८ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. या दोन महिन्यात निर्यात केलेल्या बासमतीला प्रति टन १ हजार डॉलर्सचा दर मिळाला असून हा मागच्या सहा वर्षातला सर्वोच्च दर ठरला आहे.
या दोन महिन्यात बासमती तांदळाच्या निर्यातीचे प्रमाण तुलनेने कमी होते. बासमती निर्यात दरातील तेजी सप्टेंबरपर्यंत कायम राहील, असा व्यापारी सूत्रांचा कयास आहे. बासमतीच्या नव्या उत्पादनाचे संकेत मिळेपर्यंत ही तेजी कायम राहील, असं म्हटलं जात आहे.
हेही वाचा : Orange Cultivation : संत्रा लागवड; कलमांची निवड आणि कशाची घ्याल काळजी
बासमती निर्यातीच्या प्रति युनिट दरात २० टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. एप्रिल-मे दरम्यान १०१९ डॉलर प्रति टन दराने बासमतीची निर्यात झाली. वर्षभरापूर्वी याच काळात प्रति ८४६ डॉलर प्रति टन दराने बासमती निर्यात करण्यात आली होती. मात्र यावर्षी निर्यातीचे प्रमाण ६ टक्क्याने (६.८६ लाख टन) घटले. चालू विपणन वर्षाच्या (ऑक्टोबर ते सप्टेंबर) सुरुवातीला बासमतीच्या मागणीत वाढ दिसून आली. त्यानंतर बासमती निर्यातीसाठीच्या किमतीत वाढ झाल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये निर्यातीसाठीची किंमत प्रति टन ८९० डॉलर होती. मे २०२२ला ती प्रति टन १०२१ डॉलरवर पोहचली. ( सात महिन्यांत १५ टक्क्यांची वाढ) गेल्यावर्षी नोव्हेंबर २०२० मध्ये निर्यातीसाठीची किंमत प्रति टन ८०५ डॉलर होती. मे २०२१ मध्ये ही किंमत प्रति टन ८४२ डॉलरवर पोहचली.
गेल्यावर्षी बासमतीच्या 'पुसा ११२१' आणि 'पुसा १५०९' या वाणांच्या उत्पादनात घट झाली होती. निर्यातीत या दोन्ही वाणांचा वाटा मोठा असतो. उत्पादनात घट झाल्यामुळे दरवाढीच्या अपेक्षेने निर्यातदारांनी विक्रीचे प्रमाण कमी केले. सध्या बासमतीचे पुसा ११५१ हे वाण ४० हजार रुपये प्रति टन विकल्या जात आहे, हा बासमतीचा विक्रमी दर आहे. पुढचे पीक हाती येईपर्यंत विक्रीचा हा ट्रेंड पुढची दोन महिने तसाच राहील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Share your comments