गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऊस कारखानदारी अडचणीत आली आहे. अनेक कारखाने हे कर्जाच्या खाईत गेले असल्याने त्यांनी शेतकऱ्यांना उसाचे पैसे देखील दिले नाहीत. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. असे असताना आता जळगाव येथील चोपडा शेतकरी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे देणे असलेल्या २०१४- १५ च्या हंगामातील ऊसाच्या बाकी असलेले ६०० रूपये प्रतिटन हे व्याजासकट देणेचा आदेश उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये दिलेला होता. असे असताना मात्र अजूनही हे पैसे दिले गेले नाहीत. कारखान्यावर महसुली वसूली प्रमाणपत्राप्रमाणे कार्यवाही झालेली असताना सदर रक्कम न दिल्याने ती रक्कम व्याजासह देण्यात कसूर केली.
यामुळे आता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची मालमत्तेसह बँक खाते सील करण्याचे आदेश तहसीलदार अनिल गावीत यांनी दिले आहेत. यामुळे सध्या राज्यातील इतर कारखान्याचे देखील धाबे दणाणले आहेत. अनेक कारखान्यांनी अशाप्रकारे रक्कम दिली नाही. याबाबत या कारखान्यावर मंडळ अधिकारी एस. एल. पाटील, तलाठी दिपाली ईशी यांनी ही कारवाई केली. यामुळे आता तरी शेतकऱ्यांना पैसे मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना द्यावयाची रक्कम अदा न केल्याने रक्कम १३ कोटी १३ लाख ८९ हजार रूपये देण्यात कसुरी केली. यामुळे चेअरमन व्यवस्थापकीय संचालक, चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. चहार्डी यांचे नावे असलेले मौजे चहार्डी येथील स्थावर मालमत्ता अटकाव करून ठेवण्यास आणि येणे असलेली रक्कम देण्यात आली नाही. यामुळे पुढील आदेश येईपर्यंत मालमत्ता ताब्यात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व बँक खाती देखील याद्वारे जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत पैसे कारखान्याकडून वसूल करून शेतकऱ्यांना मिळवून देणेबाबतचा अर्ज शेतकरी कृती समितीच्या वतीने दिला होता. आता संपूर्ण कारखान्यावर शेतकऱ्यांचे पैसे देणेबाबत हक्क ठेवला आहे. असे असताना जर पुढील काही दिवसात ते वसूल झाली नाही तर पुढील कार्यवाही शासन करेलच, असे शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. यामुळे आता तरी शेतकऱ्यांना पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे. याबाबत अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनी मागणी केली होती, तसेच अनेक आंदोलने देखील झाली.
Share your comments