राज्यात मोठ्या प्रमाणात फळबाग पिकांची लागवड केली जाते. नाशिक जिल्हा द्राक्षाच्या लागवडीमुळे द्राक्षे पंढरी म्हणून विख्यात आहे तर जळगाव जिल्हा केळीच्या लागवडीसाठी विशेष ओळखला जातो. खान्देश रत्न जळगाव जिल्ह्याच्या केळीला भौगोलिक नामांकन अर्थात जीआय टॅग देखील देण्यात आला आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात सध्या केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्यात विशेषता शहादा तालुक्यात केळीला कवडीमोल बाजार भाव प्राप्त होत असल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना केळी काढण्यासाठी देखील परवडत नसल्याने केळी झाडावरच पिकत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. उत्पादन खर्च केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नसल्याने झाडावरच पिकलेले केळीचे घड अक्षरशा बकऱ्यांना चारा म्हणून शेतकरी बांधव उपयोगात आणत आहेत. संपूर्ण हंगामभर हजारो रुपयांचा खर्च करून शेतकरी बांधवांनी आपला सोन्यासारखा केळीचा शेतमाल जोपासला आहे मात्र अहोरात्र काबाडकष्ट करून देखील शेतमालाला अपेक्षित बाजार भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळीचे घड पशुंना चारा म्हणून वापरण्याची नामुष्की ओढावली आहे. एक दोन महिन्यांपासून केळी निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांना केळी निर्यातीसाठी अडचणी येत आहेत त्यामुळे निर्यातदारांनी अचानक केळीची खरेदी लक्षणीय कमी केली. राज्यात सर्वत्र थंडीची लाट आली असल्यामुळे देशांतर्गत तसेच जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेत केळीच्या मागणीत मोठी घट झाली त्यामुळे केलेला अपेक्षित बाजार भाव मिळत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. परिणामी केळी उत्पादक शेतकऱ्यांना अगदी तुटपुंजी दरात केळीची विक्री करावी लागत आहे. तसंच जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी शिवारात काही शेतकऱ्यांना केळी काढायला देखील परवडत नसल्याने सोन्यासारखी केळी शिवारातील शेतकरी बकऱ्यांना खाण्यासाठी देत आहेत.
बाजारपेठेत अपेक्षित दर नसल्याने तसेच आधीच हजारोंचा खर्च केला असता केळी काढणीतुन पतदरी एक छदाम देखील पडत नसल्याने केळीचे घड झाडावरती पिकत आहेत परिणामी केळी झाडावरच सडण्यापेक्षा जिल्ह्यातील शेतकरी केळीचा गुरांसाठी चारा म्हणून वापर करत आहेत. एकंदरीत जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी विपरीत परिस्थितीत केळीची जोपासना करून यशस्वी उत्पादन घेतले मात्र केळीला तुटपुंजी दर मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकर्यांची आर्थिक कोंडी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मायबाप सरकारकडे मदतीची आर्त हाक घातली आहे.
शेतकरी बांधव आपल्या कष्टाच्या जोरावर सोन्यासारखा शेतमाल पिकवतो मात्र या कृषिप्रधान देशात बळीराजाला आपल्या स्वतःच्या मालाला भाव ठरवण्याचा देखील अधिकार नाही? त्यामुळे या कृषिप्रधान देशात कृषिप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखला जाणारा बळीराजा अस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटात पुरता भरडला जात आहे.
Share your comments