जळगाव : खानदेशातील केळी उत्पादना चिंता वाढवणारी बातमी आहे. केळीची दर कमी होत असल्याने केळी उत्पादकांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण गुजरातने केळी उत्पादनात खानदेशसमोर उभी केलेली स्पर्धा, उत्तरेकडील थंडीची लाट, धुके आदी कारणांमुळे खानदेशातील केळीचा उठाव कमी झाला आहे.
याचा परिणाम, केळीचे दर महिनाभरापासून दबावातच आहेत. कमाल दर ७८०, किमान दर ७०० व कमी दर्जाच्या केळीचे दर ५०० रुपये जाहीर होत आहेत. पण या जाहीर दरांपेक्षा कमी दरातच केळीची खरेदी व्यापारी करीत आहेत. केळीला उठाव नाही, अशी बतावणी महिनाभरापासून केली जात आहे. ४००, ३००, २०० रुपये प्रतिक्विंटल या दरात केळीची खरेदी सुरू आहे. कमी दरातील खरेदीप्रश्नी नुकतीच जळगाव जिल्हा प्रशासनाने बैठक घेतली.
लोकप्रतिनिधींनी त्यात केळी निर्यातवाढ, परवानाधारक व्यापाऱ्यांना केळीची विक्री, पणनचे नवे पर्याय यावर चर्चा केली. परंतु केळी दरात सुधारणा झालेली नाही. केळीचा व्यापार खासगी मंडळीकडे आहे. शासन कुठलीही केळी खरेदी करीत नाही. यातच मध्य प्रदेश व इतर भागातील खरेदीदार विनापरवाना केळीची खरेदी करून फसवणूक करतात, अशीही ओरड सुरू आहे.
सध्या उधारीने केळीची विक्री केली जात आहे. केळी खरेदीनंतर १५ दिवसांत पैसे देण्याचे आश्वासन खरेदीदार देत आहेत. केळीची आवक सध्या जळगाव, चोपडा, यावल, पाचोरा, भडगाव, धुळ्यातील शिरपूर या भागांत अधिक आहे. रावेरातही आगाप लागवडीच्या बागांमध्ये केळीची काढणी सुरू झाली आहे. सध्या खानदेशात रोज २३० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. आवक अधिक व मागणी कमी अशी स्थिती आहे.
हेही वाचा : Fertilizer Management: मोसंबी बागेचे खत व्यवस्थापन अशा पद्धतीने करा होईल उत्पन्नात वाढ
उत्तर भारतात गुजरातमधूनही केळीची पाठवणूक सुरू आहे. तेथून केळीची खरेदी दिल्ली, राजस्थान, पंजाबच्या खरेदीदारांना परवडते. शिवाय वाहतूक खर्च कमी येतो. यामुळे खानदेशातील केळीचा उठाव कमी झाल्याची माहिती आहे. सध्या राज्यात नागपूर, मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण यांसह राजस्थान, छत्तीसगड येथेही कमी दर्जाच्या केळीची पाठवणूक जळगावमधून सुरू आहे.
Share your comments