हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत २०२०-२१ मध्ये परताव्यासंबंधीची परिमाणके किंवा परतावा निकष बदलल्याचा चांगलाच लाभ विमा कंपनी व संबंधित घेण्याच्या स्थितीत आहेत. या योजनेत काही मंडळांमधील शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी परताव्यांचा किरकोळ लाभ देण्यासाठी तापमान व इतर आकडेवारीत गडबड करण्यात आली आहे.
दरम्यान योजनेतून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा, अशी मागणी शरद जोशीप्रणीत राज्य शेतकरी संघटनेने केली आहे.
या योजनेत तापमानासंबंधी आकड्यांमध्ये गडबड करून फक्त भोकर, भालोद व अडावद या तीनच महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी परतावे देण्यासाठी अनेकांना मॅनेज करण्यात आल्याचा दावा राज्य शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण गुर्जर यांनी केला आहे. गुर्जर यांनी याबाबत विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक समाधान पाटील व अधिकारी देवीदास कोळी यांच्याशी संपर्क साधून म्हणणे सांगितले. श्री.गुर्जर यांनी सांगितले, की तापमानाचे आकडे मॅनेज करून भोकर व इतर मंडळांमधील काहीच शेतकऱ्यांना परतावे मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत सर्व बाबी बाहेर आणल्या जातील.
भोकर नजीकचे पिंप्राळा व यावलमधील इतर मंडळे, चोपड्यातील गोरगावले व इतर महसूल मंडळदेखील परताव्यासाठी पात्र ठरायला हवे. भोकर येथे मे महिन्यात सलग पाच दिवस ४५ अंश सेल्सिअस तापमान होते. त्याच वेळी अशी नोंद पिंप्राळा व गोरगावले येथील हवामान केंद्रात कशी झाली नाही, असे किरण गुर्जर यांनी सांगितले. त्यावर हवामान केंद्र हे स्कायमेट कंपनीचे आहेत.
आकडे शासन आम्हाला पुरविते. आपण ते माहितीच्या अधिकारात मागवा. आकडे चुकीचे असतील तर आमच्या कंपनीचे परतावे वाचतील, कंपनीलाच फायदा होईल, असे कंपनीचे कोळी यांनी किरण गुर्जर यांना सांगितले. या वर्षी विमा कंपन्यांना जवळपास ५० कोटींपर्यंत फायदा होण्याची शक्यता आहे, असे किरण गुजर यांनी सांगितले.
Share your comments