Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यात बांबू लागवडीला प्राधान्य दिलं जात आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदे आता बांबू लागवडीचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समिती गठित करण्यात आली आहे. या गठीत समिती २० जणांची असून बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन आणि बांबू लागवडीचा वेळोवेळी आढावा घेऊन मार्गदर्शन करणार आहे. यात दोन्ही उपमुख्यमंत्री दलाचे सहअध्यक्षांचा ही सहभाग आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आणि बांबू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सातत्याने नैसर्गिक संकटाना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे बांबू हे पिक कमी पाणी वापरणारे तसेच जास्त प्रमाणात कार्बन शोषून घेणारे असल्यामुळे पर्यावरण स्नेही आहे. त्यामुळे राज्यात बांबू लागवड केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
तसंच वातावरणीय बदलाच्या संकटाला तोंड देण्याबरोबरच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला उदरनिर्वाहाचे साधन देखील प्राप्त होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अध्यतेखाली ही टास्क फोर्स गठीत केली आहे. या टास्कफोर्सची बैठक तीन महिन्यातून एकदा होणार आहे.
दरम्यान, मागील दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी सातारा दौऱ्यावर असताना झरे गावात देखील बांबू लागवड केली होती. तसंच राज्यातील शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून बांबू लागवड करावी, असं आवाहन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केले होते.
Share your comments