मुंबई: राज्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये जैविक शेती मिशन राबविण्यात येणार असून जैविक शेती उत्पादनाचे प्रमाणीकरण कृषी विभाग करणार असल्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी येथे सांगितले. मंत्रालयात जैविक मिशन बाबतची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
जैविक शेती मिशन अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार असून 25 हजार हेक्टरवर 10-10 गावांचे क्लस्टर करण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास 12 हजार शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे. शेतकऱ्यांना लागवडीपासून, पॅकेजिंग, विपणन यांचे प्रशिक्षण देऊन शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणानंतर किमान 3 वर्षे शेतकऱ्यांना याबाबत सहकार्य व मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जैविक शेतीचे प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. याबाबतचा आरखडा तयार करताना इतर राज्यातील शेतीपद्धतींचा अभ्यास करून महाराष्ट्रातील शेतीसाठी पूरक पद्धतींचा समावेश करण्यात यावा, असे निर्देश कृषीमंत्री डॉ. बोंडे यांनी यावेळी दिले. बैठकीस, कृषी आयुक्त सुहास दिवसे, कृषी सहसचिव गणेश पाटील त्याचबरोबर कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Share your comments