1. बातम्या

निदान मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तरी मदत द्या - देवेंद्र फडणवीस

विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील शेतकर्‍यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक अतिपावसामुळे वाहून गेले आहे. यामुळे येथील बळीराजांच्या डोळ्यात पाणी साचलंय. या शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी अशी मागणी होत आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील शेतकर्‍यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे.  हाताशी आलेले पीक अतिपावसामुळे वाहून गेले आहे. यामुळे येथील बळीराजांच्या डोळ्यात पाणी साचलंय. या शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी अशी मागणी होत आहे. मात्र शासनाकडून प्रचंड उदासिनता दाखविली जात आहे. वेगाने पंचनामे करून तत्काळ मदत शेतकर्‍यांना द्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

बांधावर जाऊन जी मदत आपण जाहीर केली, तशीच ठोस मदत कधीतरी आपल्याला मिळेल, अशी शेतकर्‍यांना आस आहे. निसर्ग चक्रीवादळ, विदर्भातील पूर, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अतिवृष्टी यात ती मिळू शकली नाही. आता किमान मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तरी द्या, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी संपूर्ण मराठवाड्याला अतिवृष्टीने झोडपले. यंदा चांगला मान्सून झाल्याने पेरणीक्षेत्रात वाढ होऊन अतिशय चांगली पिके आली होती. पण, या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले असून, सुपीक माती सुद्धा वाहून गेली आहे. जवळजवळ १८०० पेक्षा अधिक गावं यामुळे प्रभावित झाली. सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा तसेच अन्यही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही तालुक्यांमध्ये तर नुकसान हे ७० टक्क्यांच्या वर आहे. जालन्यासारख्या भागात मोसंबीचे मोठे नुकसान झाले आहे. परभणीत अजूनही शेतात पाणी आहे. गंगापूर, खुलताबाद याही भागात मोठे नुकसान झाले. मूग, उडीद या पिकांना फटका बसला. काही शेतकर्‍यांनी माल शेतात काढून ठेवल्याने मुगाला तर शेतातच कोंब फुटले. हीच स्थिती मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये असल्याचे फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

मराठवाड्यात घरांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी पूर्णपणे खचला आहे. अशात केवळ मंत्र्यांनी दौरे करायचे आणि पंचनाम्याचे आदेश दिले आहेत, असे सांगून मोकळे व्हायचे, असे करून चालणार नाही. सरकारचे प्रमुख म्हणून जागोजागी पंचनामे होत आहेत की नाही, प्रत्यक्ष जमिनीवर काय स्थिती आहे? याकडे अधिक कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. या पावसाने शेतकर्‍यांचे श्रम सुद्धा मातीमोल केले आहेत. त्यामुळे आधीच कोरोनाचे संकट आणि त्यात सातत्याने हे अस्मानी संकट त्यामुळे मानसिकदृष्ट्या तो खचला आहे. याचवेळी त्याच्या पाठिशी सरकार म्हणून ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. त्याला तातडीने मदत करण्याची गरज आहे,असेही फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.

विदर्भात पूर आला तेव्हाही सरकारकडून मदत करू, अशा घोषणा केल्या गेल्या. पण, केवळ तोंडदेखली मदत करायची म्हणून १६ कोटी रूपयांची मदत केली गेली. त्यानंतर आता कोणतीही मदत केली जात नाही. विदर्भातील पूरग्रस्तांसोबत अन्याय केल्यानंतर आता मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली जाऊ नयेत, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून थेट मदत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करावी, अशी आपल्याला विनंती आहे. असं फडणवीस यांनी पत्राद्वारे म्हटले आहे.

English Summary: At least help the farmers in Marathwada - Devendra Fadnavis Published on: 30 September 2020, 01:29 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters