
सध्या कृषी क्षेत्राला चांगले दिवस येत आहेत. केंद्र सरकारही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करत असून नव-नवीन योजनाही राबवत आहे. यामुळे शेतीकडे अनेकजणांचा ओढा वाढत स्वता:ची शेतजमीन घेण्याची इच्छा असते. परंतु जमीन घेताना अनेकांची फसवणुक होत असते. शेत जमीनची खरेदी दुसऱ्याच्या नावावर असते तर त्यावर कोणी दुसराचा शेतकरी शेती करत असतो, यामुळे वाद-विवाद होताना आपण पाहिले आहेत. कोणाला जमिनीच्या मोलापेक्षा अधिक पैसा मोजावा लागतो. यामुळे जमीन घेत असताना कोणत्या गोष्टींकडे आपण लक्ष दिले पाहिजे याची आज आपण माहिती घेणार आहोत. जमीन घेताना सर्वात आधी रस्ता कुठे आहे, काय आकार आहे, याची माहिती आपण घेतली पाहिजे. कोणत्या गोष्टींची आपण दक्षता घेतली पाहिजे याची माहिती खाली दिली आहे.
रस्ता
जमीन बिनशेती असेल तर जमीनीपर्यंतचा रस्ता नकाशामध्ये दाखविलेला असतो. परंतु जमीन बिनशेती नसेल तर व रस्ता खाजगी असल्यास रस्त्यासाठी दाखवलेली जमीन व संबंधित मालक यांची हरकत नसल्याची खात्री करावी.
आरक्षित जमिनी
शासनाने सदर जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचे आरक्षण उदा. हिरवा पट्टा, पिवळा पट्टा इत्यादी नसल्याची खात्री करावी.
वहीवाटदार - उतारावरील मुळ मालक व प्रत्यक्ष वहीवाट दार वेगवेगळे आहेत का याची खात्री करावी.
सातबाऱ्या वरील नावे - उताऱ्यावरील नावे ही विक्री करणाऱ्या व्यक्तीची आहेत ना याची खात्री करावी. त्यावर एखादा मयत व्यक्ती, जुना मालक किंवा इतर वारसाची नावे असल्यास ते कायदेशीर पद्धतीने काढुन घेणे आवश्यक आहे.
कर्जप्रकरण आणि न्यायालयीन खटला
जमिनीवर कोणत्याही बँक किंवा तत्सम व वित्तय संस्था इत्यादींचा कोणत्याही प्रकारचा बोजा नाही ना याची खात्री करावी. एखादा न्यायालयीन खटला चालू असेल तर त्या बाबतीतले संदर्भ तपासून पाहावेत. यासाठी वकिलाचा सल्ला घेणे चांगले असते.
जमिनीची हद्द
हद्द ही नकाशाप्रमाणे आहे की नाही हे तपासून पाहावे आणि शेजारील जमीन मालकची काही हरकत नाही ना याची खात्री करावी.
इतर अधिकार नोंद
उताऱ्यावर इतर अधिकार या रकान्यात इतर नावे असतील तर त्याबाबतीत माहिती करून घेणे महत्वाचे आहे. या बाबतीत बक्षीस पत्रानुसार मिळालेल्या जमिनीविषयी विशेष काळजी घ्यावी.
बिनशेती करणे
- जमिनीवर शेतातील घर सोडून इतर कोणतेही बांधकाम करायचे असल्यास बांधकामाचा प्रकार प्रमाणे जमीन बिनशेती करणे आवश्यक आहे.
संपदित जमिनी
-सदर जमिनीमधून नियोजित महामार्ग, रस्ता इत्यादी नसल्याची खात्री करावी किंवा याची उताऱ्यावर नोंद आहे की नाही याची खात्री करावी.
खरेदीखत
दुय्यम निंबधक कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून व शुल्क भरून खरेदीखत करावे. काही कालावधीनंतर खरेदी केलेल्या जमिनीचा नकाशा व आपल्या नावावर उताऱ्यामध्ये नोंद आहे की नाही याची खात्री करावी. महत्वाचे मुळ जमीन मालकाने आर्थिक व्यवहार पूर्ण केल्याशिवाय खरेदीखत करू नये.