पिकांवर कीटकनाशक फवारणीमुळे बाधित होणाऱ्या रुग्णांबाबत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
आवाहनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावरच्या पिकांच्या फवारणीचे काम शेतमजुरांना देताना, शेतमजुरांना सुरक्षाकवच (चष्मे, मास्क, हातमोजे, जॅकेट) उपलब्ध करुन द्यावेत. राज्यामध्ये शेतीपिकांवर कीटकनाशक फवारणी करताना बाधित शेतमजूर / शेतकरी रुग्णांवर उपचार करुन सुट्टी देताना त्यांना किमान 45 दिवस कीटकनाशकाच्या संपर्कात न येण्याच्या लेखी सूचना डॉक्टरांनी द्याव्यात, त्याची एक प्रत स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात पाठवावी. तसेच, शेतकऱ्यांनी कीटकनाशक फवारणी बाधित शेतमजुरांना 45 दिवस फवारणीसाठी बोलावू नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन याद्वारे करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी त्यांचे शेतावर फवारणी करताना कोणासही विषबाधा झाल्यास अशा व्यक्तींना त्वरित नजीकच्या दवाखान्यात घेऊन जावे व सोबत वापरण्यात आलेल्या कीटकनाशकांची बाटली / कंटेनरही वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवावी जेणेकरुन लवकर उपाययोजना करणे शक्य होईल, असे आवाहन कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांनी केले आहे.
Share your comments