गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी राजा पुरता मेटाकुटीला आला आहे. कधी अतिवृष्टी कधी अवकाळी कधी गारपीट कधी ढगाळ वातावरण तर कधी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला मिळणारा अत्यल्प बाजार भाव यामुळे शेतकरी राजा सुलतानी आणि आसमानी अशा दोन्ही संकटांच्या मध्ये भरडला जात आहे. त्यामुळे शेती क्षेत्राला पूरक व्यवसायाची जोड द्यावी या हेतूने गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात समवेतच संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात पशुपालन व दुग्धव्यवसाय केला जात आहे.
केवळ शेती करून आर्थिक सुबत्ता प्राप्त करणे मोठे जिकिरीचे असल्याने शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने पशुपालन हा जोडव्यवसाय निवडला खरं मात्र आता पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अलीकडे पशुखाद्याच्या दरात कधी नव्हे ती विक्रमी वाढ नमूद करण्यात आली असल्याने पशुपालक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. सरकी पेंडीचे भाव गेल्या अनेक वर्षापासून दिन दोगुनी रात चौगुनी प्रगती करत शिखरावर विराजमान झाले असतानाच आता ज्वारी मका सोयाबीनचे दर वाढल्याने पशुखाद्य बनविणार्या कंपन्यांनी सर्वच पशुखाद्यात मोठी वाढ केली आहे. एकीकडे पशुखाद्याचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत तर दुसरीकडे दुधाचे दर मात्र जैसे थे तसेच आहेत त्यामुळे दुग्ध उत्पादन घेणारे शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडल्याचे संपूर्ण राज्यभरात बघायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यात पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे, जिल्ह्यातील अनेक शेतकरी उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने इतर शेतकऱ्यांप्रमाणे शेती क्षेत्राला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन करतात.
निसर्गाच्या लहरीपणामुळे केवळ शेती क्षेत्रातून आपला उदरनिर्वाह देखील भागविणे शेतकऱ्यांना कठीण होऊन बसले होते म्हणून त्यांनी पशुपालन करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात पशुपालक शेतकऱ्यांना व्यवसायातून चांगला मोबदला मिळाला मात्र आता गेल्या अनेक वर्षापासून पशुखाद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने, व दुधाला आधी जेवढा भाव मिळत होता तेवढाच मिळत असल्याने पशुपालक शेतकऱ्यांची मोठी कुचंबना होत आहे. दुग्ध उत्पादन वाढीसाठी पशुपालक शेतकऱ्यांना पशूंच्या चाऱ्यावर/आहारावर विशेष लक्ष द्यावे लागते. त्या अनुषंगाने पशुपालक शेतकऱ्यांकडून सरकी, मक्का चुन्नी, हरभरा चुन्नी, सुग्रास इत्यादी पशुखाद्यासाठी नेहमी मागणी असते.
मात्र आता पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दुधाच्या उत्पन्नापेक्षा पशुधनाच्या चाऱ्यासाठी अधिकचा खर्च होत असल्याने पशुपालक शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय परवडेनासा झालाय. पशुखाद्याचे दर दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत असल्याने पशुधन जोपासणे आता मोठे अवघड होऊन बसले आहे, त्यामुळे जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर पशुधनाची उचलबांगडी करत पशुपालन व्यवसाय बंद करावा लागेल असे मत पशुपालक व्यक्त करत आहेत.
Share your comments