राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी कापूस आयात प्रश्नावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 11 टक्के आयातशुल्क माफ करुन 16 लाख कापूस गाठी आयात केल्यामुळं देशात कापसाचे भाव पडले आहेत. त्यामुळं शेतकरी संकटात सापडले आहेत. कॅाटन असोशीयशन ॲाफ इॅडियाच्या दबावामुळे केंद्र सरकारने कापसावरील 11 टक्के आयात शुल्क रद्द केल्याचे देशमुख म्हणाले.
आज शेतकऱ्यांचा कापूस आणि सोयाबीन उत्पादन खर्चही निघत नाही. राज्य सरकारनं कापूस आणि सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे केले. 1 हजार 71 कोटीच्या मदतीची घोषणा केली तरी शेतकऱ्यांच्या खात्यात अजुनही मदतीचे पैसे जमा झाले नाहीत. कापूस, सोयाबीनला चांगला भाव मिळाला नाही तर यंदा शेतकरी आत्महत्या वाढतील. मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांचा दसरा आणि दिवाळी अंधारात जाणार आहे. हे सरकार फोडाफोडीचं राजकारण करत आहे, या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही असे देशमुख म्हणाले.
सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळं शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. कापूस, सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात असून यवतमाळ जिल्ह्यात 2022 मध्ये 272 शेतकरी आत्महत्या, तर 2023 मध्ये 188 शेतकरी आत्महत्या झाल्या. हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार असल्याचे ही अनिल देशमुख म्हणाले. ललित पाटील आणि कंत्राटी भरती प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी कशी दिशाभुल केली? यावर वेगळी पत्रकार परिषद घेऊन बोलणार असून हे भाजपचं सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका अनिल देशमुखांनी केली.
Share your comments