सोमिनाथ घोळवे,
दसऱ्याच्या दिवशी बहुतांश साखर कारखान्यांचा बॉयलरचे अग्निप्रदीपन कार्यक्रम घेऊन ऊसाचा गळीत हंगाम सुरू करण्यात येतो. दसरा केवळ 1 दिवस राहिलेला आहे. यावरून मी ज्यावेळी कारखान्याला ऊस तोडायला जात होतो, तेव्हाचे हंगामाच्या सुरुवातीचे दिवस आठवतात. तसेच मनात अनेक प्रश्न पडतात. प्रथम कारखान्यांवर गेल्या- गेल्या काय हाल-अपेष्ठा असतात?.
ज्यावेळी मजूर म्हणून कारखान्यावर जात होतो, त्यावेळी पूर्ण संसार बरोबर घेतलेला असायचा. कारखान्यांचे प्रशासन दाखवेल त्या उघड्या जागेवर, आई-वडील उघड्यावर संसार मांडलेला असायचा. हे आमचेच होते असे नाही. तर सर्वच मजुरांचे असेच होते. निवारा नाही, की आसरा नाही..स्वच्छ जागा नाही. कमरे इतके गवत वाढलेले असल्याचे. ये गवत कापून, उपटून जागा करायची.
त्या जागेवर जेव्हा कारखान्याकडून दहा बांबू, वेळूच्या साहाय्याने विणलेल्या चार चटई देतील तेव्हा कोठे आडूसा-निवारा तयार होयचा....मजूर कारखान्यावर गेल्यावर किमान चार -आठ दिवस बांबू-चटई मिळत नसायचे... त्यामुळे "कोपी"चा निवारा तयार होत नाही. त्यात वरून असा सतत ऊन, वारा, पाऊस.... सर्व संसार उघड्यावर असतोच.
काय अवस्था असेल मजुरांची. काय मानसिकता असेल मजुरांची याचा कोणी सहजा विचार करत नाहीत. आमच्या बरोबर अनेकदा लहान मुले, म्हातारी कुटुंबातील सदस्य असतं. त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल. लहान मुलांचा कारखान्यावर गेले की नव्या इलक्याचा संपर्क येत असे. बाल मनावर गरिबीचे संस्कार तेथेच सुरू होऊन जातं होते. तेच संस्कार पुढे हळूहळू बळकट होत गेले दिसून येतात. तर म्हताऱ्या-वयस्कर आई-वडिलांना काय वाटत असेल. आयुष्य हे गरीबीत गेले, मुलांच्या वाट्यालाही गरिबीचे आयुष्य आल्याने ऊसतोडणी सारखे कमी दर्जाचे काम करणे वाट्याला आले. गरिबीची सल मनाला सारखी बोचत राहाते.
कारखान्यावर गेल्यावर किती अडचणी येतात, याचा विचार केला आहे का?.
गॅस वापरता येत नाही, ज्वलन नाही, जनावरांना चारा नाही, पिण्यास शुध्द पाणी नाही. भाजीपाला नाही. दिला तर रस्त्यावरील दिव्याचा उजेड... नाही तर तोही नाही.... एकीकडे हिवाळ्याच्या गारवा सुरू होऊ लागला आहे, तर दुसरीकडे वरून डोक्यावर वारा,ऊन, पाऊस पडत आहे. त्यात घरी लहान मुलं-बाळांना ठेवता येत नसल्याने सर्व बिराड बरोबर घेऊन आलेले... शुद्ध पाणी-सकस आहार मिळत वेळेवर मिळत नाही, त्यामुळे ही लहान मुले आजारी पडतात. या आजारी मुलांना, कारखान्यावर गेल्या-गेल्या दवाखान्यात घेऊन जाण्याची वेळ येते, तेव्हा मीठ-मिरचीसाठी आणलेले चार पैसे किंवा उसने-पासने करून दवाखान्याची भरती करावी लागते....
लेखक शेती , दुष्काळ , ऊसतोड मजुर प्रश्नांचे अभ्यासक असून 'द युनिक फाऊंडेशन, पुणे' येथे वरिष्ठ संशोधक आहेत.
Share your comments