Mumbai News : सह्याद्री अतिथीगृहात आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार देखील या बैठकीला उपस्थित होते. मराठा आरक्षण आंदोलनाने मागील दोन दिवसांपासून हिंसक वळण घेतले आहे. यावर बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.
बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकार आरक्षणाच्या बाजूने आहोत.विरोधकांनी सकारात्मक राहिलं पाहिजे. विरोधी पक्षाची भूमिका महत्वाची असते आपणही सरकारला मदत करणं अपेक्षित आहे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. तसंच त्रुटी काढून आरक्षण देऊ. सुप्रीम कोर्टात क्युरेटीव्ह पिटीशन दाखल करण्यात आली आहे. आणि त्याची तारीख लवकरच मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.
आरक्षण देताना कायद्याची बाजू समजून घेतली पाहिजे. तसंच कायद्याचा पातळीवर टिकेल अशा गोष्टी सरकार करेल. राजकारण कोणालाही करायचं नाही. आपण सगळे याबाबत सहकार्य करतच आहात, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसंच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मराठा आरक्षणावर केंद्र काही मदत करणार का? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बैठकीत उपस्थित केला आहे. केंद्र आणि राज्याने मिळून आरक्षणावर तोडगा काढावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
मराठा आरक्षणासाठी समाज आक्रमक झाला असून समाजाने हिंसक भूमिका घेतली आहे. ठिकठिकाणी जाळपोळ केली जात आहे. राज्यातील सरकार असंवेदनशील असून राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
Share your comments