1. बातम्या

मराठवाड्यातील दुष्‍काळ मुक्‍तीसाठी सर्वांनी प्रयत्‍न करण्‍याची गरज

लातूर: मराठवाड्यात सातत्‍याने पडत असणाऱ्या दुष्‍काळामुळे शेतकरी त्रस्‍त असुन मराठवाडा दुष्‍काळ मुक्‍त करण्‍यासाठी शासन, शेतकरी, कृषी विभाग व कृषी विद्यापीठ सर्वांनी प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे. इस्राईल सारख्‍या देशात महाराष्‍ट्र पेक्षाही कमी पाऊस पडतो, तरीही तो देश जगात कृषी उत्‍पादनात अग्रेसर आहे. इस्राईल तंत्रज्ञानाचा अभ्‍यास शास्‍त्रज्ञांनी करून ते तंत्रज्ञान राज्‍यातील शेतकऱ्यांना देण्‍याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन लातुर विधानसभा सदस्‍य माननीय आमदार श्री. अमित देशमुख यांनी केले.

KJ Staff
KJ Staff


लातूर:
मराठवाड्यात सातत्‍याने पडत असणाऱ्या दुष्‍काळामुळे शेतकरी त्रस्‍त असुन मराठवाडा दुष्‍काळ मुक्‍त करण्‍यासाठी शासन, शेतकरी, कृषी विभाग व कृषी विद्यापीठ सर्वांनी प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे. इस्राईल सारख्‍या देशात महाराष्‍ट्र पेक्षाही कमी पाऊस पडतो, तरीही तो देश जगात कृषी उत्‍पादनात अग्रेसर आहे. इस्राईल तंत्रज्ञानाचा अभ्‍यास शास्‍त्रज्ञांनी करून ते तंत्रज्ञान राज्‍यातील शेतकऱ्यांना देण्‍याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन लातुर विधानसभा सदस्‍य माननीय आमदार श्री. अमित देशमुख यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषी विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्‍त दिनांक 17 सप्‍टेंबर रोजी लातुर येथील कृषी महाविद्यालयात आयोजित रब्बी शेतकरी मेळाव्‍याच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले हे होते तर व्‍यासपीठावर लातुर जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. डी. एस. गावसाने, आत्‍माचे प्रकल्‍प संचालक डॉ. दिनकर जाधव, प्रगतशील शेतकरी श्री. राजकुमार बिराजदार, प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्राचार्य डॉ. हेमंत पाटील, प्राचार्य डॉ. भगवान इंदुलकर, प्राचार्य डॉ. व्‍यंकट जगताप, विद्यापीठ नियंत्रक श्री. एन. एस. राठोड, डॉ. अरूण कदम, डॉ. दिगांबर चव्‍हाण, डॉ. सचिन डिग्रसे, प्रगतशील शेतकरी श्री. अशोकराव चिंते, प्रगतशील महिला शेतकरी श्रीमती मालनताई राऊत, डॉ. महारूद्र घोडके, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात माननीय आमदार श्री. अमित देशमुख पुढे म्‍हणाले की, शेतकऱ्यांनी आपल्‍या शेतीला शेतीपुरक व्‍यवसायाची जोड द्यावी. सामान्‍य शेतकरी केंद्रबिंदु ठेवुन शासनाचे कृषी धोरण पाहिजे, गाव आधारित पिक विमा योजना राबवावी लागेल. शेतमालाची आधारभुत किंमती वाढविण्‍याची गरज असुन शेतकरी आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी ठोस शासकिय धोरण आखावे लागेल. ऊसापासुन इथेनॉल व वीज निर्मितीवर भर द्यावा लागेल, साखर हा उपपदार्थ झाला पाहिजे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

अध्‍यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले म्‍हणाले की, परभणी कृषी विद्यापीठ विविध माध्‍यमातुन कृषी तंत्रज्ञान विस्‍ताराचे कार्य करित असुन शेतकऱ्यांनी कृषी तंत्रज्ञानाची माहितीसाठी कृषि विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांशी सातत्‍याने संपर्कात रहावे. शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पध्‍दतीचा अवलंब करावा. गटशेतीही काळाची गरज असुन शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येण्‍याची गरज असल्‍याचे ते म्‍हणाले.

जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. डी. एस. गावसाने यांनी आपल्‍या भाषणात शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्‍या विविध योजनेचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले तर आत्‍माचे प्रकल्‍प संचालक डॉ. डि. एल. जाधव यांनी शेतकऱ्यांनी संघटित होऊन शेती करण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन केले. प्रगतशील शेतकरी श्री. राजकुमार बिराजदार, श्री. अशोकराव चिंते, महिला शेतकरी श्रीमती मालनाताई राऊत यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. प्रशांत देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. दयानंद मोरे व डॉ. जयश्री देशमुख यांनी केले तर आभार डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी मानले. तांत्रिक सत्रात हवामान बदलावर आधारीत पिक पध्‍दतीवर डॉ. भगवान आसेवार, सुधारित हरभरा लागवड तंत्रज्ञानावर डॉ. प्रशांत पगार, गळीत धान्‍य लागवड तंत्रज्ञानावर डॉ. महारूद्र घोडके तर रब्बी हंगामातील किडी व्‍यवस्‍थापनावर डॉ. संजय बंटेवाड आदी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले तर चर्चासत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या विविध शेतीविषयी शंकांचे निरासरण केले. 

तसेच तुती पिकावरील ऊझी माशीचे व्‍यवस्‍थापन या घडीपत्रिकेचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तर काही निवडक शेतकऱ्यांना विद्यापीठ विकसित विविध पिकांचे बियाणे व दोन हजार वृक्ष वाटप करण्‍यात आले. याप्रसंगी विद्यापीठ शिफारसीत तंत्रज्ञानावर आधारित व इतर संलग्‍न विभागांचे प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले होते. मेळाव्यात विद्यापीठ संशोधित बियाणांची विक्रीस शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद होता. मेळाव्‍यास शेतकरी बांधवासह बचत गटांच्‍या शेतकरी महिलांचा उल्‍लेखनिय सहभाग होता.

English Summary: All need to strive for drought relief in Marathwada Published on: 19 September 2019, 07:08 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters