सध्या उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येथे सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. कोरोनामुळे बंदी असली तरी छुपा प्रचार सुरुच आहे. सुरुवातीला भाजपसाठी सोप्पी वाटणारी ही निवडणूक आता समाजवादी पक्षाने अवघड केली आहे. अनेक आमदार आणि मंत्र्यांनी भाजपला सोडून अखिलेश यादव यांच्या सपामध्ये प्रवेश केला आहे. यामुळे चुरस निर्माण झाली आहे. यामुळे ही निवडणूक कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समाजवादी पक्ष मतदारांना आकर्षिक करण्यासाठी विविध घोषणा देत आहे.
आता अखिलेश यादव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत एक मोठी घोषणा केली आहे. अखिलेश यादव म्हणाले की, उत्तर प्रदेशात सरकार आल्यानंतर १० रुपयात समाजवादी थाळी देणार आहोत. या थाळीत पौष्टीक आहार असतील. त्याचसोबत यूपीत ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच समाजवादी पेंशन योजना, अशा अनेक घोषणा त्यांनी केल्या आहेत. यामुळे मतदार काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल.
कोरोना महामारी काळात महारष्ट्र सरकारने शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरुवात केली. यामध्ये आतापर्यंत ५ कोटींहून अधिक लोकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे. गरीब आणि गरजू व्यक्तींना स्वस्तात भोजन मिळावे यासाठी शिवभोजन थाळी योजना महाराष्ट्रात सुरु करण्यात आली होती. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात, जिल्हा रुग्णालय, बस स्थानकं, रेल्वे परिसर यासाठी शिवभोजन थाळी देण्यात येते. यामुळे अनेकांना याचा फायदा झाला आहे. यामध्ये अनेक मंत्री देखील जेवले त्यांनी स्वतः त्याची गुणवत्ता देखील तपासली.
या शिवभोजन योजनेत ३० ग्रॅम चपात्या, १०० ग्रॅमची एक वाटी भाजी, १५० ग्रॅमचा एक भात, १०० ग्रॅमचे एक वाटी वरण समाविष्ट असलेली ही थाळी दुपारी १२ ते २ या वेळेत दिली जाते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गरिब जनतेला १० रुपयात शिवभोजन थाळी देणार, असे आश्वासन दिले होते. आणि त्यांनी ही योजना सुरु देखील केली. आता हजारो लोक याचा फायदा घेत आहेत. आता उत्तर प्रदेशमध्ये या घोषणेमुळे काय फरक पडणार का हे लवकरच समजेल.
Share your comments