मुंबई
मनोरा आमदार निवासाचे आज (दि.२) रोजी भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदी मान्यवर उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमासाठी हजर नसल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या रिक्त असलेल्या खुर्चीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बसण्याचा योग आला. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनीच अजित पवार यांना खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला.
नेमकं काय घडलं?
आज मनोरा आमदार निवासाचे उद्घाटन होते. त्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले. मात्र या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे उपस्थित नव्हते. त्यामुळे मंचावर मुख्यमंत्र्यांच्या नावाची स्टिकर लावली खुर्ची देखील होती. पण मुख्यमंत्री उपस्थित नसल्याने विधानसभा अध्यक्ष यांनी स्वत:च मुख्यमंत्र्यांच्या नावाने असलेले स्टिकर काढून अजित पवार यांना त्या खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले.
दरम्यान, महाराष्ट्रातील आमदारांसाठी राहण्याची व्यवस्था असणारे मनोरा आमदार निवासाच्या २ इमारती बांधण्यात येणार आहे. एक इमारत ४० आणि दुसरी इमारत २८ मजल्यांची असणार आहे. यासाठी सुमारे १३०० कोटी रुपये खर्च असणार आहे. विधानसभेच्या २८८ तर विधान परिषदेच्या ७८ अशा एकूण ३६८ आमदारांसाठी एकाच संकुलात निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
Share your comments