Pune News : देशासह राज्यातील हवेची गुणवत्ता पातळी खालावली आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. दिल्लीसह मुंबई आणि पुण्यातील हवा दिवाळीपूर्वी बिघडली होती. पण दिवाळीतील फटाक्यांमुळे पुन्हा हवेची पातळी बिघडली आहे. सध्या पुणे आणि मुंबईतील हवेची गुणवत्ता खूप प्रमाणात बिघडली असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशात मुंबई दिल्लीसह अनेक शहरांची हवा प्रदूषित झाली होती. त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हवेतील धुलिकण कमी होऊन प्रदूषणात घट झाली होती.
हवेची गुणवत्ता खराब झाल्यामुळे प्रशासनाने यंदा फटाके फोडण्यावर निर्बंध लावले होते. पण नागरिकांनी या नियमांना केराची टोपली दाखवल्याचे दिसून आलं आहे. अनेक ठिकाणी दुपारपासून ते रात्री उशीरा पर्यंत फटाके फोडत असल्याचे चित्र दिसून आलं. परिणामी त्याचा परिणाम वायू प्रदुषणावर झाला. सोबतच ध्वनी प्रदुषण देखील वाढले.
फटाके फोडण्याबाबतच्या सूचना असतांनाही मध्यरात्रीनंतरही मुंबईत मोठ्या प्रमाणात फटाके वाजवण्यात आले. यामुळे लक्ष्मीपूजनानंतर मुंबईची हवा अधिक बिघडली. दिवाळीपूर्वी समाधानकारक श्रेणीत असलेला एअर क्वालिटी इंडेक्स पुन्हा खराब श्रेणीत पोहोचला आहे. तसंच मुंबई पुण्यासह राज्यभरात अनेक शहरात हवेची गुणवत्ता खूपच बिघडली आहे.
दरम्यान, हवेची गुणवत्ता जेव्हा खराब असते तेव्हा मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. खास करुन उच्च प्रदूषणाच्या काळात किंवा दाट लोकवस्ती असलेल्या शहरी भागात, N95 मास्क वापरण्याचा विचार करावा. हे मास्क सूक्ष्म कण फिल्टर करण्यासाठी डिझाइन केलेले असतात. ज्यामुळे तुमच्या श्वसन प्रणालीला संरक्षणाचा एक स्तर प्रदान होऊ शकतो. यामुळे नागरिकांना आजारांना बळी पडण्याचा रस्ता बंद होतो.
Share your comments