1. बातम्या

एग्रोव्हिजनचा उद्देश विदर्भात आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे कृषी उद्योग स्थापन करणे

KJ Staff
KJ Staff


नागपूर:
जैवइंधन, दुग्धव्यवसाय, मधमाशीपालन यासारख्या कृषीपूरक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे कृषी उद्योग विदर्भात स्थापन करुन ग्रामीण व आदिवासी भागातील लोकांचे राहणीमान उंचावणे हे एग्रोव्हिजनचे उद्देश आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग जहाज बांधणी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरात केले. 

एग्रोव्हिजन फाऊंडेशनतर्फे कृषी प्रदर्शन यावर्षी 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान नागपूरच्या रेशीमबाग मैदानात आयोजित केले जाणार असून, यासंदर्भात माहिती देण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना ते बोलत होते. याप्रसंगी एग्रोव्हिजनचे संयोजक गिरीश गांधी, आयोजन सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर व एम.एस.एम.ई. विकास संस्था नागपूरचे संचालक पी. एम. पार्लेवार उपस्थित होते.

मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असणाऱ्या एग्रोव्हिजनचे हे 11 वे वर्ष अ‍सून यंदा एम.एस.एम.ई. नोंदणीकृत उद्योगांचे दालन, तसेच जैवइंधन व जैवउर्जा यावर आधारित दालने हे विशेषत: स्थापण्यात येतील. रामटेक तालुक्यात नेपीअ‍र ग्रासची लागवड केल्याने डिझेलला पर्याय ठरणाऱ्या बायो सी.एन.जी.ची निर्मिती या गवतापासून करता येणे शक्य होणार आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या ताफ्यातील सुमारे 50 बसेस आता बायो सी.एन.जी. वस संचालित झाल्या आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदीया यासारख्या वनव्याप्त जिल्ह्यांमध्ये मधाचे उत्पादन वाढण्यासाठी 2 लाख मधुमक्षीका पेटींची मागणी करण्यात आली आहे तसेच या जिल्ह्यात जट्रोफा या जैवइंधनाच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या बिया वाटपाचाही कार्यक्रम सुरु करण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.

विदर्भातील कृषी उद्योगाबाबत माहिती देतांना गडकरी पुढे म्हणाले की, वर्धा जिल्ह्यातील सिंदीविहीर येथे भाजीपाला कटिंग व पॅकेजिंग यूनिट अ‍सून, त्यामार्फत दुबईच्या बाजारपेठेत 30 कंटेनर भाजीपाला निर्यात होतो. मदर डेअरीच्या नवीन उत्पादित संत्रा मावा बर्फीमूळे विदर्भातील दूध व संत्रा उत्पादकांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होत आहे. या सर्व कृषी क्षेत्रातल्या नाविन्यपुर्ण उपक्रमांना व यशकथांना प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी देऊन जनजागृती करावे, असे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले.

कृषी प्रदर्शन, कार्यशाळा, परिसंवाद यांची रेलचेल असणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्‌घाटन 22 नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या उपस्थितीत होणार असून 23 नोव्हेंबरला विविध कृषी कार्यशाळांचे उद्‌घाटन केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री गिरीराज सिंग करतील तर 24 नोव्हेंबरला कृषी व अ‍न्नतंत्रज्ञान यावरील परिषदेचे उद्‌घाटन केंद्रीय अन्नप्रक्रीया उद्योग मंत्री हरसिमरत सिंग कौर बादल करणार आहेत, अशी माहिती आयोजन सचिव रवी बोरटकर यांनी यावेळी दिली.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters