१.राज्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज
२.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली पीक विम्याची रक्कम
३. कृषी पुरस्कारांच्या रक्कमेत चौपट वाढ
४.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी कृषी विभागातर्फे ४८.६३ कोटी रुपये वितरित
५.तारळी प्रकल्पातील उपसा सिंचन योजनांची कामे महिनाभरात पूर्ण करावीत'
१.राज्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज
राज्यात काही प्रमाणात थंडी कमी होऊ लागली आहे.उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी-अधिक होत असून हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये थंडीची लाट आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने थंडी गायब झाली आहे.तर आज मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता असून, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात दोन दिवसांपासून कडक ऊन पडत असून त्यामुळे थंडी कमी झाली आहे. मात्र, थंडीच्या लाटेमुळे राजधानी दिल्लीतील वातावरण दमट आहे. देशाच्या पूर्वेकडील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर पंजाब आणि हरियाणामध्ये थंडीची लाट पसरताना दिसत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतातील अनेक भागात हलका पाऊस पडू शकतो.
२.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली पीक विम्याची रक्कम
नंदुरबार जिल्ह्यातील केळी आणि पपई च्या बागांना मोठा फटका हा अवकाळी पावसामुळे बसला होता.डिसेंबर महिन्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाल्याने या अवकाळी पावसामुळं शेती पिकांना मोठा फटका बसला होता.त्यामुळे केळी आणि पपई च्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.यावेळी फळ उत्पादक शेतकऱ्यांनी हजारो रुपये भरून पिक विमा काढला होता.शेतकऱ्यांना या नुकसानीसाठी पिक विम्याची रक्कम मिळाली आहे.नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विमा कंपनी आणि कृषी विभाग यांच्याकडे पाठपुरवा केला होता. मात्र, त्यांना न्याय मिळत नव्हता. जिल्ह्यातील दोन हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे .नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न एका वृत्तवाहीनीने माझाने लावून धरला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. विमा कंपनीने फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्यास सुरुवात केली आहे.विमा कंपनीने २ कोटी ९८ लाखाची मदत देण्यास सुरवात केली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ४३ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई मिळत असल्यानं नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी खुश झाले आहेत.
३. कृषी पुरस्कारांच्या रक्कमेत चौपट वाढ
धनंजय मुंडेंनी नुकतीच कृषी पुरस्कार संदर्भात माहीती दिलीय.यंदा राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्याकरिता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे,अशी माहिती त्यांनी दिलीय.कृषिरत्न पुरस्काराची रक्कम आधी केवळ ७५ हजार रुपये होती. वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण आणि सेंद्रिय शेतीमधील कृषिभूषण व उद्यानपंडित या पुरस्कारांची आधीची रक्कम ५० हजारांवरून आता दोन लाखापर्यंत वाढविण्यात आली आहे. वसंतराव नाईक शेतीमित्र व युवा शेतकरी पुरस्काराची रक्कम आता ३० हजारांऐवजी १.२० लाख रुपयांपर्यंत दिली जाणार आहे.वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार राज्यभरातील प्रयोगशील शेतकऱ्यांना दिले जातात. त्यासाठी पहिले ११ हजार रुपये दिले जात होते. परंतु आता त्यासाठीची ही रक्कम ४४ हजार रुपये राहील.पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी या पुरस्कारार्थींना प्रत्येकी १५ हजार रुपयेदेखील देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असुन अशी माहिती धनंजय मुंडेंनी नुकतीच कृषी पुरस्कार संदर्भात माहीती दिलीय
४.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी कृषी विभागातर्फे ४८.६३ कोटी रुपये वितरित
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत कृषी विभागाने २४५३ दावे निकाली काढले असून त्यापोटी ४८ कोटी ६३ लाख रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे.राज्यात ७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या १३८ दिवसांच्या खंडित कालावधीतील ७७ (७३ मृत्यू व ४ अपंगत्व) पात्र दाव्यांपोटी १ कोटी ५१ लाख रुपयाचा विमा वितरित करण्यात येणार आहे. तसेच राज्यात २३ ऑगस्ट २०२२ ते १८ एप्रिल २०२३ या कालावधीतील २३९ दिवसांच्या खंडित कालावधीतील पहिल्या टप्प्यातील २३९ (२३७ मृत्यू व २ अपंगत्व) पात्र दाव्यांपोटी ४ कोटी ७६ लाख रुपये व दुसऱ्या टप्प्यातील २१३७ (२०९४ मृत्यू व ४३ अपंगत्व) पात्र दाव्यांपोटी ४२ कोटी ३६ लाख रुपये अशा प्रकारे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील पात्र दाव्यांच्या अनुषंगाने अपघातग्रस्त शेतकरी/वारसदारांना आर्थिक मदतीची ४७ कोटी १२ लाख रुपये वितरित करण्यात येणार आहे.
५.तारळी प्रकल्पातील उपसा सिंचन योजनांची कामे महिनाभरात पूर्ण करावीत'
सातारा जिल्ह्यातील तारळी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजनांची कामे पूर्ण करावीत. या योजनांची कामे पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना लाभ देता येईल. सिंचन क्षेत्रात वाढ होऊन शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळेल, त्यासाठी तारळी प्रकल्पातील उपसा सिंचनाची कामे महिनाभरात पूर्ण करावीत, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.तारळी प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात ५० मीटर उंचीवरील उपसा सिंचन योजनांचा आढावा घेत मंत्री श्री. देसाई म्हणाले की, पहिल्या टप्प्यातील पाल, इंदोली, तारळे, बांबवडे, कोंजवडे, धूमकवाडी व अंबर्डे या उपसा सिंचन योजनांपैकी अपूर्ण योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच दुसऱ्या टप्प्यात १०० मीटर उंचीवरील उपसा सिंचन योजनांची कामेही पूर्ण करावीत. उपसा सिंचन योजनांमधील कामांचे गळती शिवाय प्रात्याक्षिक घेण्यात यावे. हे काम युद्ध पातळीवर पूर्ण करून १०० टक्के प्रात्याक्षिक घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
Share your comments