अहमदनगर: शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात वाढ होऊन त्यांना शाश्वत आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासोबतच जे विकते ते पिकवायला शिकविण्यासाठी राज्यातील कृषी विद्यापिठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वित्त व नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाला 151 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे मागोवा 2018 या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वित्त व नियोजन आणि वनमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा उपस्थित होते. यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार प्रकाश गजभीये, डॉ. भास्कर पाटील, नाथा चौगुले, सुनिता पाटील, अशोक फरांदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे, डॉ. शरद गडाख आदी उपस्थित होते.
राज्यासह संपूर्ण देशात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे महत्त्व मोठे आहे. विद्यापीठाला आवश्यक असलेल्या भौतिक सोईसुविधांसोबतच शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या संशोधनाच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. देशात कृषीक्षेत्र महत्त्वाचे आहे. कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. शेती व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी कृषी विद्यापीठाचे संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे. बाजारपेठेत जे विकू शकते ते पिकविणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना विक्रीकौशल्याबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे सांगून पाच एकर ते शंभर एकर हा यशस्वी शेतकऱ्यांचा प्रवासही त्यांनी सांगितला.
कृषीक्षेत्र हे सर्वाधिक रोजगार निर्माण करणारे क्षेत्र आहे. राज्यात निम्म्यापेक्षा जास्त रोजगार कृषीक्षेत्रात आहे. त्यामुळे राज्याच्या विकासात कृषीक्षेत्राचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे. प्रत्येक कृषी विद्यापीठाने किमान 10 गावे दत्तक घेऊन या गावात शेती उत्पादनवाढीसोबतच विक्री कौशल्याबाबत मार्गदर्शन करावे. ही गावे नक्कीच शेतीची प्रयोगशाळा होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृषी विद्यापीठामधून अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात अधिकारी म्हणून दिसतात ही आनंदाची बाब आहे, यासोबतच या पुढील काळात कृषी विद्यापीठामधून आदर्श शेतकरी निर्माण होणे आवश्यक आहे. बल्लारपूर येथे बांबू, कुक्कुटपालन, अगरबत्ती निर्मिती आदी शेतीपूरक उद्योगाच्या यशोगाथा त्यांनी सांगितल्या. कृषी दर्शनी 2019, दिनदर्शिका 2019 व फुले कृषीदर्शनी मोबाईल एपचे प्रकाशन करण्यात आले. बांबू हस्तकला प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले.
शिवार फेरी आणि शेतकऱ्यांशी संवाद
वित्त व नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांना भेट देत प्रकल्पाच्या माध्यमातून सुरु असलेले काम व संशोधनाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार स्नेहलता कोल्हे, कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा आदी उपस्थित होते. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट देत बांबूपासून बनविलेल्या विविध वस्तू पाहून त्यांनी कौतुक केले. विविध कार्यक्रमात स्वागत करताना बांबूच्या वस्तू देत स्वागत करण्याची नवी प्रथा आम्ही चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. कोरडवाहू फळ संशोधन केंद्र, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, उद्यानविद्या विभाग, पशुसंवर्धन विभाग आदी विभागातील प्रक्षेत्राला भेट देत पाहणी केली. चंद्रकांत एकनाथ अडसूरे व उत्तम एकनाथ अडसूरे या प्रयोगशील शेतकरी कुटुंबियांशी श्री. मुनगंटीवार यांनी संवाद साधला. पीकपद्धती, चारापिके, दुग्ध व्यवसाय, फळशेतीची पाहणी केली. शेतीत येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजनांबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. दुग्ध व्यवसायाचे अर्थशास्त्रही श्री. मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांकडून जाणून घेतले.
Share your comments