१) कृषी जागरण आणि सोमानी सीड्समध्ये करार
भारतातील अग्रगण्य भाजीपाला बियाणे उत्पादक कंपनी सोमानी कनक सीड्स आणि अग्रगण्य कृषी मीडिया हाऊस कृषी जागरण यांनी अधिकृतपणे एक सामंजस्य करार केला आहे. ज्याचा उद्देश 10 हजार शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाच्या संधी वाढवण्यासाठी शिक्षित करणे आणि त्यांना मदत करणे हा आहे. यामुळे कृषी जागरण आणि सोमानी सीड्स 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2024 पर्यंत बिहार, छत्तीसगड, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या आठ राज्यांतील 50 हून अधिक जिल्ह्यांमध्ये मुळा पिकाबाबत कार्यशाळा घेणार आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध मार्गदर्शन आणि आर्थिक सक्षम कसे व्हावे याबाबत तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
२) राज्यात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने बदल होताना दिसून येत आहे. तर आता कुठे अवकाळी तर कुठे उष्णतेची लाट अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आता हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे. तर पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहील. तर, शहर आणि उपनगरात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे.
३) पावसामुळे आंब्याचा मोहर गळाला
काल कोल्हापुर जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे काही पिकांना जीवदान तर काही पिकांचं नुकसान झालं आहे. तर सध्या आंब्याचा हंगाम सुरु झाला आहे. पण अवकाळीचा फटका गावरान आंब्याला बसला आहे. पावसामुळे गावरान आंब्याचा मोहर गळून केला आहे. यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. आधीच यंदा गावरान आंब्याला मोहर बहार कमी लागला होता. त्यात पावसाने हजेरी लावली यामुळे होता नव्हता तो मोहर देखील गळून केला आहे. मात्र या पावसामुळे भाजीपाला पिकांना चांगलं जीवदान मिळाल आहे. तर सध्या पाणी टंचाईची शेतकऱ्यांना झळ सोसावी लागत आहे. त्यात या पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे.
४) आंब्याची आवक वाढू लागली, दर पण चांगला
उन्हाळा म्हटलं की आंब्याचा हंगाम. तर या हंगामात आंबा प्रेमी मनसोक्त आंबा चाखतात. सध्या बाजारात मोठ्या संख्येने हापूस आंबा दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नवी मुंबईतील वाशी बाजार समितीत दिवसेंदिवस आता आंब्याची आवक वाढत आहे. तर या आंब्याला ४०० ते १५०० रुपये डझनचा दर मिळत आहे. या दरामुळे काही नागरिकांना अजूनही आंबा चाखता येत नाही. यामुळे या नागरिकांना आणखी काही दिवस दर कमी होण्याची वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना आंबा खाण्याचा आनंद घेता येणार आहे. तर दुसरीकडे उन्हाचा पारा वाढत असल्याने आंबा लवकर तयार होत आहे. यामुळे बाजारात आवक वाढू लागली आहे.
५) राज्यात चाराटंचाई, उपाययोजना कधी?
एकीकडे राज्यात उन्हाचा पारा वाढत असताना दुसरीकडे दुष्काळीची तीव्रता देखील अधिक गंभीर होत असल्याचं दिसून येत आहे. यासोबतच आता जनावरांच्या चारा प्रश्न देखील समोर येताना दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात जनवारांच्या चारा प्रश्न आता मोठ्या प्रमाणात समोर येताना दिसत आहे. तसंच दुसरीकडे आचारसंहिता असल्यामुळे सरकारला किंवा संबंधित यंत्रणांना चारा संबंधित निर्णय घेता येत नसल्याचं काही अधिकाऱ्यांकडून बोललं जात आहे. त्यामुळे वाढत्या पाणी व चाराटंचाईमुळे राज्यातील पशुधन पुढील दोन महिने कसे सांभाळायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तसंच यंदा दुष्काळाच्या तीव्र झळा बसत असल्याने चाऱ्याचे दर देखील दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आता दिसून येत आहे. तरी देखील शेतकरी जनावरे जगावण्यासाठी जास्तीच्या दराने चारा खरेदी करत आहेत.
Share your comments