१)राज्यातील तापमानात वाढ होण्याचा अंदाज
राज्याच्या तापमानात चढ-उतार सातत्याने पाहायला मिळत आहे. आता राज्यातील तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. तर निफाडमध्ये ९.१ निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे आता राज्यातील तापमान १० अंशांवर राहिल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. तसंच आगामी काळाची उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाजही हवामान खात्याने दिला आहे. उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हलका ते मुसळधार पावसामुळे वातावरण पुन्हा थंड झाले आहे. दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून हलका पाऊस सुरू आहे. यामुळे दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या परिसरात तापमानात घट नोंदवण्यात आली आहे.
२)पीएम किसानच्या निधीत वाढ करण्याचा निर्णय नाहीच
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काल देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पीएम किसान योजनेचा हप्ता वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळत होती. पण अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे जे लाभार्थी आस लावून बसले होते. त्यांची निराशा झाली आहे. तसंच एप्रिल किंवा मे मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे पीएम किसान योजनेतून मिळणाऱ्या रक्कमेत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. पण तसं झालं नाही.
३)अर्थसंकल्पात नैसर्गिक शेतीला बळ देण्याचा प्रयत्न
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काल देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी मुंडे म्हणाले की, या अर्थसंकल्पात देशातील शेतकऱ्यांना पुरेपुर न्याय व काळानुरूप शेतीमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना बाबत संतुलन साधले आहे. नैसर्गिक शेतीला बळ देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आल्यामुळे १ कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी बळ मिळण्यासोबतच ग्राहकांना सुद्धा विषमुक्त अन्न उपलब्ध होणार आहे. साठवणूक सुविधांवर भर दिल्याने शेतकऱ्यांना शेतमाल साठवणूक व योग्य भाव आल्यावर बाजारात विकणे शक्य होणार आहे, असं धनजंय मुंडे यांनी म्हटले आहे.
४)अवकाळीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार निधी
गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या बाबतचा शासन आदेश काढण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.
५)'आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनासाठी प्रशिक्षणाचा प्रस्ताव तयार करा'
आदिवासी भागातील शेतकरी, युवक आणि महिलांना रोजगार व स्वयंरोजगारास चालना देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ तयार करण्याचे आदेश आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले. मंत्रालयात मंत्री डॉ.गावित यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी समुहांसाठी मधुमक्षिका पालन व्यवसाय प्रशिक्षणाबाबत बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
Share your comments