१) पीक विमा योजना अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय
पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणी मधील अडीअडचणी दूर करून ही योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबवण्याकरिता अथवा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम तसेच कृषी विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला चालू हंगामातील पीक विम्याचा आढावा घेण्यात आला. तसेच आधार लिंक अथवा इतर कारणांमुळे पीक विमा पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयांच्या बाहेर लावण्याची सूचना कृषीमंत्री मुंडे यांनी केली.
२) नंदुरबारमध्ये २ हजार गाईंचे वितरण करणार; मंत्री विजयकुमार गावितांची माहिती
आदिवासी दुर्गम भागात स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण व्हावा यासाठी जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात प्रत्येक तालुक्यात १ हजार याप्रमाणे २ हजार गाईंचे वितरण करण्यात येणार असून आमचूरच्या प्रक्रिया उद्योगासाठी या दोनही तालुक्यांसाठी सुमारे सव्वा आठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला, असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे. आदिवासी भागातील सर्व रस्ते जून अखेरपर्यंत पूर्णत्वास येतील. या रस्त्यांच्या माध्यमातून शाळा, रूग्णालये, तालुका मुख्यालये, अंगणवाड्या, आश्रमशाळा थेट रस्त्यांनी जोडले जाणार आहेत. त्यामुळे दळण-वळण व त्या भागातील उद्योग व्यवसायांच्या भरभराटीसही चालना मिळणार आहे. त्यात दुधाळ गाईंचे वाटप केल्याने दुग्ध व्यवसाय भरभराटीस येणार आहे. तसेच वनपट्टेधारतांना शेळ्यांचेही वितरण केले जाणार आहे. धडगाव अक्कलकुवा तालुक्यात आमचूरवर प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ३ हजार महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यातील निधीचेही वितरण करण्यात आले आहे, असं मंत्री गावित म्हणाले.
३) राज्यात उन्हाचा चटका वाढला
मागील दोन दिवसांपूर्वी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात अवकाळीने हजेरी लावली. त्यानंतर वातावरणात बदल झाला असून उन्हाचा चटका वाढला आहे. तसंच ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळत आहे. काल मंगळवारी परभणी येथे राज्यातील उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी कमाल तापमान ३४ अंशांवर आहे. तसंच मराठवाडा आणि विदर्भातच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येसुद्धा पावसाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तर किनारपट्टी भागामध्ये हवेतील आर्द्रता अधिक असेल ज्यामुळं उष्णतेचा दाह अधिक जाणवणार आहे.
४) बाजारात उन्हाळ कांद्याची आवक सुरु
कांदा निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन कराव लागल आहे. त्यात आता उन्हाळ कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. या कांद्याला सरासरी आकराशे ते बाराशे रुपयांचा दर मिळतोय. तर काल मंगळवारी राज्यभरात कांद्याची २ लाख ४८ हजार २७२ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. या कांद्याला देखील सरासरी आकराशे रुपयांचा दर मिळाला आहे. उन्हाळ कांद्याची साठवण क्षमता जास्त दिवस नसते. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याची साठवण करता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या दरात कांदा विकावा लागतो. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
५) तुरीला मिळतोय चांगला दर
तुरीचे भाव अद्यापही कायम आहेत. सध्या बाजार समितीत तूरीची आवक सुरु आहे. सध्या तुरीला देशात ९ हजार ५०० ते १० हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. यंदा केंद्र सरकारने तूरीचा हमीभाव ७ हजार रुपये जाहीर केला आहे. पण यंदा तुरीचे उत्पादन कमी असल्यामुळे आणि आयात कमी होत असल्याने देशांतर्गत तुरीला चांगला दर मिळत आहे. काल मंगळवारी राज्यातील बाजार समितीत ५६ हजार ४१३ क्विंटल तुरीची आवक झाली.
Share your comments