१) राज्यातील ५ हजार बसेस एलएनजीवर धावणार
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ५ हजार डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू म्हणजे एलएनजी या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या एलएनजी इंधन वापरामुळे डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणामध्ये सुमारे दहा टक्के घट होण्यास मदत होणार आहे. एकूण ५ हजार डिझेल वाहनांचे एलएनजी वाहनांमध्ये रुपांतरण हे तीन वर्षामध्ये एकूण ६ टप्यात करण्यात येणार आहे. संपूर्ण पाच हजार बसेसचे रुपांतरण झाल्यानंतर दरवर्षी महामंडळाचे सुमारे २३४ कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे. राज्यातील ९० आगारांमध्ये एलएनजी इंधन भरण्याची सोय करण्यात येणार आहे.
२) लातूरच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे नूतनीकरण होणार
लातूर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी तत्काळ २ कोटी रुपयांचा निधी देण्याचे आदेश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेत. तसेच संपूर्ण नूतनीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश कृषीमंत्र्यांनी दिलेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लातूर येथील अडचणी दूर करण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकही शासकीय कृषी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी महाविद्यालय नसल्याने नवीन महिला कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी निधी मागणीचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्याचे निर्देश यावेळी मंत्री मुंडे यांनी दिले.
३) हरभऱ्याचा पेरा घटला, दर वाढले
यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचा पेरा घटल्यामुळे उत्पादनात घट निर्माण झाली आहे. यामुळे देशात सध्या हरभऱ्याचे दर वाढले आहेत. तसंच आगामी काळात दर कमी होण्याची शक्यता फार कमी आहे. तर काल ६ फेब्रवारी राज्यातील बाजार समितीत १४ हजार २०४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली आहे. या हरभऱ्याला ५ हजार ते ५ हजार ८०० दरम्यान दर मिळला आहे. तर यंदा केंद्र सरकारने हरभऱ्याची आधारभूत किमत ५ हजार ४४० रुपये जाहीर केली आहे.
४) सोयाबीनला ४१०० रुपयांचा दर
सोयाबीन दराची घसरण थांबून दर स्थिर झाले आहेत. काल ६ फेब्रुवारी रोजी राज्यभरातील बाजार समितीत सोयाबीनची ३५ हजार ७ क्विंटल आवक झाली आहे. या सोयाबीनला ४ हजार १०० ते ४ हजार ३०० रुपयांचा दर मिळाला आहे. तर यंदा केंद्र सरकारने सोयाबीनची आधारभूत किंमत ४ हजार ६०० रुपये जाहीर केली आहे. सध्या बाजार समितीतील सोयाबीनची आवक टिकून आहे. तसंच यंदाच्या वर्षी ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादनात देखील घट झाल्यामुळे आगामी काळात देखील सोयाबीनचे दर टिकून राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
५) राज्यात उन्हाचा चटका वाढला
उत्तर भारतात थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. यामुळे नागरिकांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र राज्यात आता उन्हाचा चटका वाढल्याने नागरिकांना गरमीला सामोरे जावे लागत आहे. सध्या राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकमधील निफाड येथे नीचांकी १० अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान ११ ते २२ अंशांच्या दरम्यान आहे.
Share your comments