१.राज्यात थंडीचा जोर वाढला; पुढील काही दिवस धुके कायम
उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी असून राज्यातही आता थंडी वाढताना दिसत आहे. तसंच वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने तापमानात चढ-उतार होत आहे. आता पुन्हा राज्यातील वातावरणात बदल झाल्याने पुढील काही दिवस मुंबईसह ठाणे, कोकण आणि पुणे शहर गारठताना दिसत आहे. तर पुढील तीन ते चार दिवस धुकं आणि थंडी वाढेल, असा अंदाज देखील हवामान खात्याने दिला आहे.आयएमडीच्या अंदाजानुसार, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडच्या अनेक भागांमध्ये शनिवारी सकाळपर्यंत आणि काही भागात रात्री-सकाळी काही तास आणि पुढील चार दिवस दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये शनिवारी आणि रविवारी सकाळी काही तासांसाठी आणि पुढील तीन दिवस वेगवेगळ्या भागात रात्री-सकाळी दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे.
२.२५ कोटी लोक आता माझे साथीदार -पं नरेंद्र मोदी
सोलापूर जिल्ह्यातील रे नगर मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या ३० हजार घरांपैकी पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांचे लोकार्पण संपन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांना चावी वाटप करण्यात आले. त्यावेळी बोलतांना मोदी म्हणाले,‘‘गरिबांचे स्वप्न पूर्ण करणे हाच माझा संकल्प आहे. दहा वर्षांपूर्वी देशात सर्वत्र फक्त झोपड्या दिसत होत्या. मात्र आता झोपड्या ऐवजी पक्की घरे देत आहोत. यापूर्वी गरिबी हटवाचे नारे दिले जायचे. मात्र गरिबी कधी हटली नाही. ‘अर्धी भाकर खा आणि मते द्या’, अशा घोषणा त्यावेळी व्हायच्या, पण आता घोषणा द्यायची वेळ येणार नाही, ही गॅरंटी देतो.’’‘‘२०१९ ला या घरांच्या पायाभरणी समारंभाला मी आलो होतो आणि त्यावेळी मी शब्द दिला होता की, घरांच्या चाव्या द्यायला मी येणार, ती माझी गॅरंटी होती आणि आज या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे. त्यामुळे मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी,’’ अशी ग्वाही श्री. मोदी यांनी दिली.
३.आजच्या राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांबदल आस्था राहिली नाही-शरद पवार
सांगोला येथे ‘गणेशरत्न राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे’ उद्घाटन श्री. पवार यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते. ‘शेकाप’चे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, रतनबाई देशमुख, बळिराम साठे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, बाबूराव गायकवाड, जयमाला गायकवाड आदी उपस्थित होते.‘आजच्या राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांबदल आस्था राहिली नाही. खाणाऱ्यांचा विचार जरूर केला पाहिजे, परंतु शेतकऱ्यांनी पिकविलेच नाही तर काय खाणार ? यासाठी प्राधान्याने पिकविणाऱ्यांकडे लक्ष दिले पाहिजे, त्यांच्याकडे दुर्लक्ष नको,’’ असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. १९) व्यक्त केले.पवार म्हणाले, की पूर्वी देशात गहू, तांदूळ, साखर, फळफळावळ आदी अनेक प्रकारचे अन्नधान्य परदेशातून आयात करावे लागत होते. परंतु तत्कालीन सरकारच्या प्रयत्नातून देशात अन्नधान्य उत्पादन वाढविण्यात आले. त्यातूनच गहू, साखर, तांदूळ, फळफळावळ अनेक देशांना निर्यात करण्यात देशाने आघाडी घेतली आहे. परंतु मोदी सरकारने त्यात खो घालण्याचे धोरण अंगीकारत शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू केले आहे. कांदा व साखर निर्यातीवर आणलेली बंधने हे त्याचेच द्योतक आहे. कांदा निर्यातीवर ४० टक्के अबकारीशुल्क लादण्यामागे देशात कांदा दर स्थिर राहावा आणि महागाई नियंत्रणात यावी, हा हेतू असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. परंतु कांदा दर आणि महागाई यांची तुलना करणे पूर्णत: चुकीचे आहे,असे पवार यांनी सुनावले.
४.उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येच यंदा भीषण पाणीटंचाईची शक्यता
उजनी धरणाच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे.उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येच यंदा पाणीटंचाईची शक्यता वर्तवण्यात येतेय.महाराष्ट्रातील दुसरं सर्वांत मोठं धरण म्हणून उजनी धरणाकडे पाहिलं जातं.जायकवाडी धरणानंतर हे महाराष्ट्रातील दुसरे धरण आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी या धरणाचं भूमीपूजन केलं होतं.उजनी धरणामुळे आशपासच्या जिल्ह्यांना पाणी मिळतय.. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत. मात्र, याच उजनीच्या परिसरातल्या गावांवर आता दुष्काळाचं सावट घोंगावतंय.गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात उजनी धरणातील पाणीसाठा 100 टक्के होता. पण यावर्षी हा पाणीसाठा मायनस मध्ये जाऊ शकत.. फेब्रुवारी महिन्यानंतर धरणात केवळ पाण्याचा मृतसाठा उपलब्ध असेल. आता उपलब्ध असलेला पाणीसाठा पुढचे सहा-सात महिने पुरेसा पाऊस येईपर्यंत वापरावा लागणार आहे.
५.ईडीच्या नोटीसला रोहित पवारांनी दिले प्रतिउत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ईडीने नोटीस बजावली आहे. नोटीसद्वारे रोहित पवारांना ईडीने २४ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत आमदार रोहित पवार बारामती अॅग्रोचे संचालक आहेत. काही दिवसांपूर्वी बारामती अॅग्रोशी संबंधित कारखाने आणि कार्यालयांवर ईडीने छापे देखील टाकले होते. त्यानंतर पुन्हा रोहित पवारांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे रोहित पवार आणि शरद पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.ईडीच्या बातमीमुळं राज्यातून अनेकांनी फोन मॅसेज केले. या सर्वांचे मनापासून आभार मानतो. परंतु काळजीचं काहीही कारण नाही. कोणत्याही अधिकाऱ्यांची चूक नसते तर ते केवळ आदेशाचं पालन करुन त्यांचं काम करत असतात म्हणून त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजपर्यंत सर्वच यंत्रणांना सहकार्य केलं आणि यापुढंही राहील. म्हणूनच ईडीला विनंती केली की, मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर २४ तारखेऐवजी २२ किंवा २३ तारखेलाच चौकशीला बोलवावं, तशी माझी तयारी आहे. अशी मला अपेक्षा आहे, असं रोहित पवार ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.
Share your comments