मुंबई: ग्राहकांना कृषी उत्पादके रास्त दरात मिळावित या उद्देशाने मुंबईत पहिल्यांदा महाफार्मची सुरुवात करण्यात आली आहे. कृषी उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांना नफा मिळवून देण्याचा शासनाचा मानस आहे, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. राज्य शासनाच्या सहकार विकास महामंडळाच्यावतीने कुलाबा येथील सहकार भांडारमध्ये कृषी उत्पादके विक्रीसाठी महाफार्म सुरू करण्यात आले आहे. या महाफार्मचे उद्घाटन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहकार भांडारचे अध्यक्ष संजय शेट्टे उपस्थित होते.
राज्यातील पाच हजार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी शासनाने अटल महापणन विकास अभियान सुरू केले आहे. या अभियानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या एक हजार ग्राम सामाजिक परिवर्तनाचा सुद्धा समावेश आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कृषी मालास बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि शेतकऱ्यांना थेट नफा मिळावा म्हणून महाफार्म हा ब्रँड विकसीत केला आहे, असेही मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.
महाफार्म अंतर्गत काजू, काजू तुकडा, काजू पूर्ण, हळद पावडर, कांदा लसूण मसाले, काळा मसाले, कोल्हापूरी मसाले अशी विविध उत्पादने सहकारी भांडारमध्ये ठेवण्यात आली आहेत. तसेच महाफार्मस या ब्रँडखाली राज्यातील सहकारी संस्था, बचत गटांच्या उत्पादनांचे मार्केटींग करण्याचे काम सुरू आहे. अलिकडेच महाफॉर्मची उत्पादने पंजाबमधील सहकारी भांडारमध्येही ठेवण्यात आली असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.
Share your comments