अमरावती: कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी गर्दी टाळण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी खरीप हंगामात कृषी निविष्ठा थेट बांधावर पोहोचविण्याचे नियोजन आहे. कृषी सेवा केंद्राच्या सहकार्याने कृषी विभागाने समन्वयकाची भूमिका बजावून ही प्रक्रिया गतीने राबवावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी येथे दिले.
जिल्ह्यातील खरीपपूर्व तयारीचा आढावा, कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही, कापूस, तूर, हरभरा खरेदी आदी विविध विषयांवर बैठक पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, पणन महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चव्हाळे, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांच्यासह विविध कृषी सेवा केंद्रचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, कोरोना प्रतिबंध व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी कृषी निविष्ठा थेट शेतीच्या बांधावर पोहोचविण्यात येत आहेत. अद्यापपर्यंत साडेसात हजार बॅग खत विविध ठिकाणी पोहोचविण्यात आले आहे. मात्र, जून महिना लक्षात घेता परिपूर्ण नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व कृषी सेवा केंद्राच्या सहकार्याने कृषी विभागाने समन्वय करावा. काऊंटरवरील गर्दी टाळावी. गावपातळीवर कृषी सहायक समन्वयकाची भूमिका बजावेल. त्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यामार्फत ऑनलाईन गुगल फॉर्म उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याची माहिती सर्वदूर पोहोचवावी. जिथे अडचणी येत असतील, तिथे कृषी सहायकाने प्रत्यक्ष लक्ष घालून त्याचे निराकरण करावे. मात्र, वेळेत पेरणी होण्यासाठी निविष्ठा पोहोचल्याच पाहिजेत, याची खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.
कृषी निविष्ठा बांधावर पोहोचविण्यासाठी विविध गट, आत्मा, कृषी सेवा केंद्रे यांना उपक्रमात सहभागी करून घ्यावे. शेतकरी बांधवांकडून कुठेही अतिरिक्त दर आकारला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसा प्रकार होत असल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
कापूस, तूर, हरभरा खरेदीबाबतही यावेळी चर्चा झाली. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, लॉकडाऊनच्या काळात पीक खरेदीची गती काहीशी मंदावली. पण तसे घडता कामा नये. शेतकरी बांधव हा देशाचा कणा आहे. खरीप हंगाम जवळ आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी तात्काळ दूर कराव्यात. पीक खरेदीची प्रक्रियाही गतीने राबवावी. नियोजनानुसार खरेदी झाली पाहिजे. त्यादृष्टीने सीसीआय, पणन महासंघ यांनी प्रयत्न करावे. कोरोना संकटकाळ लक्षात घेता अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. मात्र, त्याशिवाय ही कामे पूर्णत्वास जाऊ शकणार नाहीत, हे लक्षात ठेवून काम करावे. कापूस खरेदीची गती वाढवावी. गोदामांची अनुपलब्धता असेल तर तात्काळ उपलब्ध करून घ्यावेत. तिथे पुरेशी सुरक्षितता असावी. आगीसारख्या दुर्घटना घडता कामा नयेत, असेही निर्देश त्यांनी दिले.
बाजार समितीमध्ये खासगी व्यापाऱ्यांकडून अनेकदा खरेदी होते, मात्र, त्याचे पैसे शेतकऱ्याला विलंबाने मिळतात. व्यापाऱ्यांकडून मध्यस्थांकडे लवकर पैसे मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्यात अडचणी येतात, अशी तक्रार होते. या बाबींचे संनियंत्रण ठेवण्यासाठी सहायक निबंधक व संबंधित समित्यांनी वेळोवेळी तपासणी केली पाहिजे जेणेकरून शेतकरी बांधवांना तात्काळ मोबदला मिळेल. जिल्हा उपनिबंधकांनी सर्व सहायक निबंधकांना तशा सूचना द्याव्यात. याप्रकारची किती खरेदी झाली व किती शेतकरी बांधवांना पैसे मिळाले, त्याचा दैनंदिन अहवाल सादर करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
किटकनाशकांच्या विक्रीबाबतचा फॉर्म क्लिष्ट असल्याने देयक तयार व्हायला वेळ लागतो व खरेदी प्रक्रिया मंदावते, अशी तक्रारी कृषी केंद्रचालकांनी केली. त्याबाबत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी बैठकीत कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून यावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले. कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
Share your comments