राज्यातील लघु आणि सूक्ष्म व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी उद्योग विभाग बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांच्यामध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील दालनात उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी तसेच बीएसई तर्फे अजय ठाकूर यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे राज्यातील लघु, सूक्ष्म तसेच मध्यम स्वरूपाच्या उद्योगांना भांडवल निर्माण करण्यासाठी पुरेसे पर्याय उपलब्ध होतील असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
बीएसईचे प्रमुख अजय ठाकूर यांनी म्हटले की, या कराराच्या माध्यमातून आम्ही राज्यातील विविध एसएमइ व त्यांचे प्रतिनिधी आणि उद्योग धंद्यामधील विविध संघटना पर्यंत पोहोचून त्यांच्यात जनजागृती करणार आहोत. मागच्या दोन वर्षांमध्ये 331 लघुउद्योग यांनी शेअर बाजारातून सुमारे 22 हजार कोटी इतके भांडवल गोळा केले. याद्वारे त्यांना त्यांच्या उद्योगविषयी विविध योजना कार्यान्वित करण्यासाठी मदत झाली. छोट्या उद्योगांना मोठे होण्याची संधी यामुळे उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.
जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळ-जवळ 10 लाख नोंदणीकृत लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांची अधिकृत नोंद आहे. कंपन्यांनी या भांडवली बाजारमध्ये नोंदणी केल्यास त्यांच्या उद्योगांची वाढ होऊन रोजगार वाढीस चालना मिळते. भांडवली बाजाराचे फायदे काय आहेत हे सांगण्यासाठी बीएससीतर्फे जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून लघु मध्यम उद्योगांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तसेच महाराष्ट्रातील विविध औद्योगिक संघटनांकडून या बाबतीत विविध प्रकारची शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.यावेळी नवी मुंबई येथे कौशल्य विकास केंद्र उभारणे तसेच अन्न प्रक्रिया पार्कची उभारणी करण्यावर चर्चा करण्यात आली. तसेच चेंबर्स ऑफ कॉमर्ससोबत राज्यशासनाच्या सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले.
Share your comments