स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील उसाला चारशे रुपयांचा भाव मिळावा यासाठी आक्रोश यात्रा सुरू केली आहे. मात्र, साखर कारखानदारांनी अद्याप यावर कोणताच निर्णय घेतलेला नाही.त्यामुळे शेतकरी संघटनेचे आंदोलन चिघळले आहे. तसेच आता राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक साखर कारखान्याच्या चेअरमनच्या दारात खर्डा भाकरी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामूळे सर्व कारखानदारांच्या बंगल्या समोर शुक्रवारी खर्डा भाकरी आंदोलन करण्यात आले. दरम्यान राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि महादेवराव महाडिक यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकरत्यांकडून खरडा-भाकरी देण्यात आली. जवाहर साखर कारखान्याचे चेअरमन आमदार प्रकाश आवाडे यांनाही आंदोलकांनी खर्डा-भाकरी खायला लावली आहे.वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, व्यवस्थापक शरद मोरे, आरगेतील शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे, तासगाव कारखान्याचे अध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांच्या बंगल्यावर जाऊन यांनाही खर्डा भाकरी देण्यात आली.
पहिली उचल आणि गत वर्षीचा दुसरा हप्ता न दिल्यास ऊस वाहतूक करणारी वाहने पेटवू असा इशारा सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. ऊस उत्पादकांची दिवाळी गोड नसेल, तर कारखानदारांचीही दिवाळी गोड होऊ देणार नाही, असाही इशारा खराडे यांनी खर्डा भाकरी आंदोलना वेळी दिला.
Share your comments