केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी लावल्याकारणाने विरोधकांनी आक्रमक भुमिका घेत विधान भवनाच्या पायऱ्यांवर गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केले. विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.
या आंदोलनाच्या वेळी सोयाबीन उत्पादकांना भाव मिळावा आणि कांदा निर्यातीवरील बंदी उठवावी अशा मागण्या करण्यात आल्या. त्याच बरोबर "गद्दार सरकार हाय हाय, खोके सरकार हाय हाय, कांदा निर्णयात बंदी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धक्कार असो, मोदी सरकारचा धिक्कार असो, निर्यात बंदी हटवलीच पाहिजे केंद्रतील मोदी सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय." अशा घोषणाही देण्यात आल्या.
तसेच अंबादास दानवे यांनी भाजप सरकारवर टीका करणारी एक पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात की,केंद्रातील भाजप सरकार कसे शेतकरी विरोधी आहे याची तीन ज्वलंत उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत.१. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या पिकाला चांगला भाव मिळत असताना परदेशातून कापूस आणण्याची परवानगी दिली. परिणामी भाव पडले आणि शेतकऱ्याच्या खिशात दोन पैसे अधिकचे पडण्याची शक्यता संपली. २. कांदा उत्पादक शेतकरी गारपीट आणि बेमोसमी पावसाने त्रस्त असताना परिस्थितीतून सावरण्याची संधी सरकारने हिरावून घेतली ती कांद्यावर निर्यातबंदी लागू करून.
३. राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्वाचा वाटा असलेल्या साखर कारखान्यांवर उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घातली. महाराष्ट्र इथेनॉल निर्मितीत अग्रेसर आल्याने याचा सर्वाधिक तोटा आपल्यालाच होणार आहे. कारखाना आजारी झाले तर याचा थेट परिणाम सर्वसामान्य शेतकऱ्यांवर होणार आहे.एकीकडे शेतकरी पायावर उभे राहत असताना त्यांना रोखायचे आणि जुजबी रकमा 'इव्हेंट' करून त्यांच्या खात्यावर टाकायच्या, हेच आहे यांचे शेतकाऱ्यांसाठीचे धोरण. अशी टीका भाजप सरकारवर पोस्टच्या माध्यमातून अंबादास दानवे यांनी केली आहे.
Share your comments