प्रहारचे आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 29 ऑक्टोबर रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान 15 ऑक्टोबरला मुंबईत बच्चू कडू यांनी मुंबईत मेरा देश मेरा खून या मोहिमेची सुरुवात केली होती. या मोहिमेचा दुसरा टप्पा हा अयोध्येमध्ये होणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.आम्ही हजारोंच्या संख्येने अयोध्या दौऱ्यावर जाणार आहोत. प्रभू रामाचं दर्शन घेणार आहोत आणि प्रभू रामचंद्रच्या चरणी कापूस,ऊस, संत्रा, तूर ,सोयाबीनचा प्रसाद चढवणार आहोत. या सरकारला बुद्धी दे, अशी प्रार्थना प्रभू रामाकडे करणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले.
शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांचं आर्थिक आरक्षण निर्माण व्हावं यासाठी आमची लढाई असणार आहे. तसेच राष्ट्रवादी किसान दलने आम्हाला आमंत्रित केलं आहे. आम्ही हे अभियान शहिदांचं स्मरण व्हावं आणि शेतकऱ्यांचं मरण होऊ नये यासाठी राबवत आहोत. संत्राचा मुद्दा हा केंद्र सरकारचा आहे पण बांग्लादेश संत्र्यावर आयात शुक्ल लावत असेल तर त्यांच्या मालावरही आपण लावावा, अशी मागणीही बच्चू कडू यांनी केली.
शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार यावं, शेतकऱ्यांच्या हिताचे धोरणं व्हावीत , अयोध्येमधील शहिदांचं स्मारक व्हावं.यासाठी आम्ही अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहे. आमचं आंदोलन सरकारच्या विरोधात आहे की सरकारच्या बाजूने आहे हे सरकारने शोधावं. सरकारला वाटलं की हे आंदोलन विरोधात आहे तरी त्याची तमा नाही, असं बच्चू कडू यावेळी म्हणालेत.
Share your comments