चंदन उद्योजकांनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील असे वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
मंत्रालयातील दालनात राज्यातील चंदन उत्पादन वाढीसाठी उत्तेजन देण्याबाबत वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व मुख्य महाव्यवस्थापक( नियोजन) संजीव गौंड, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) नागपूर जीत सिंग, व्यवस्थापकीय संचालक बांबू विकास मंडळ श्रीनिवास राव,
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या संचालक श्रीमती अभरना, चंद्रपूरचे वनसंरक्षक किशोर मानकर,वन विभागाचे उपसचिव गजेंद्र नरवणे, चंदन उद्योजक वदीराज मदभावी या बैठकीला उपस्थित होते. वने राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले, राज्यात चंदनाची लागवड वाढून हा उद्योग वाढल्यास राज्याच्या महसूलात भर पडेल.चंदन उद्योगासाठी धोरणात्मक निर्णय घेवून जे उद्योजक या क्षेत्रात काम करण्यासाठी तयार आहेत त्यांना सहकार्य करण्यात येईल. शासनस्तरावरून देण्यात येणाऱ्या परवानग्या विहित वेळेमध्ये देण्याबाबत सर्व यंत्रणांना सूचना देण्यात येतील. चंदन पावडर,तेल तसेच चंदन काड्या यांना मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीयस्तरावर मागणी आहे
त्यामुळे चंदन लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. या उद्योगाला बळकटीकरणासाठी शासन नक्कीच प्रोत्साहन देईल. अगरबत्तीच्या व्यवसायात कशा प्रकारे चंदनाचा समावेश करता येईल याचीही पाहणी वने विभागाने करावी. जेणेकरून अगरबत्ती व्यवसायाला देखील गती मिळेल, असेही राज्यमंत्री श्री.भरणे यांनी स्पष्ट केले. यावेळी चंद्रपूरचे वनसंरक्षक किशोर मानकर यांनी अगरबत्ती व्यवसायाची सद्य:स्थितीची माहिती सांगितली.
यावेळी चंदन उद्योजक वदीराज मदभावी यांनी चंदन उद्योगात महाराष्ट्राला असलेल्या संधी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील चंदनाची मागणी, चंदन उद्योजकांना शासनाकडून हवे असलेले सहकार्य याबाबतीत सविस्तर सादरीकरण केले.
Share your comments