गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी राजा पुरता हतबल झाला आहे. या खरीप हंगामात (Kharif Season) देखील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामात देखील अवकाळी पाऊस (Untimely rain) व गारपिटीने (Hailstorm) मोठा धुमाकूळ घातला आहे त्यामुळे रब्बी हंगामातील पिकातून पदरी किती उत्पादन पडते याबाबत शेतकर्यांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके बहरत आहेत मात्र रब्बी हंगामाच्या पिकांसाठी पोषक वातावरण नसल्याने रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते असा अंदाज तज्ज्ञांद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे रब्बी हंगामानंतर योग्य नियोजनानुसार शेतकरी राजांना कार्य करणे आवश्यक आहे.
कृषी तज्ञांच्या मते, रब्बी हंगामानंतर (Rabbi Season) उन्हाळी मूग लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. उन्हाळी मूग लागवडसाठी उन्हाळ्यातील वातावरण पोषक असते शिवाय यंदाच्या उन्हाळ्यात तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे हे वाढते उन मुगाच्या विकासासाठी उत्तम असल्याचे सांगितले जात आहे. खरीप व रब्बी हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी हरभरा व ज्वारी पिकाच्या काढणीनंतर कृषी तज्ञांनी मुग पेरणीचा सल्ला दिला आहे. ज्या ठिकाणी पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे त्या ठिकाणी मूग लागवड विशेष फायदेशीर ठरणार आहे. मुगाचे पीक दोन महिन्यात काढणीसाठी तयार होते या कालावधीत या पिकाला पाच ते सहा वेळा पाणी भरणे अनिवार्य असते. आपल्याजवळ असलेल्या पाण्याचा साठा विचारात घेऊन शेतकरी बांधवांनी या पिकाची लागवड करावी असे देखील सांगितले गेले आहे.
मुग लागवडीसाठी काही महत्वाच्या सूचना- मूग लागवड करण्यासाठी वातावरण आणि शेत जमीन महत्त्वाचा रोल प्ले करतात. यंदा खरीप हंगामात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील अनेक भागात मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध आहे त्यामुळे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई काढण्यासाठी मुगाचे पीक महत्त्वाचे ठरू शकते. मुगाची पेरणी मध्यम ते भारी शेतजमिनीत करण्याचा सल्ला दिला जातो. असे असले तरी, मुगाची पेरणी अशा जमिनीत केली गेली पाहिजे ज्या जमिनीत पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने होतो. ज्या जमिनीत पाण्याचा चांगला निचरा होत नाही अशा जमिनीत मुगाची पेरणी केल्यास बुरशीजन्य रोगाचा कायम प्रादुर्भाव बघायला मिळू शकतो.
मुगाची पेरणी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते 15 मार्च च्या दरम्यान करण्याची शिफारस केली जाते. मुगाची पेरणी तिफणीच्या साह्याने करणे अतिशय गरजेचे आहे. मुग पेरणी करताना दोन ओळींतील अंतर 30 सेंटिमीटर तर दोन रोपातील अंतर दहा सेंटीमीटर असल्यास यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. एकरी सहा किलोपर्यंत मुगाचे बियाणे पेरणीसाठी लागत असते, मात्र घरचे बियाणे जर वापरत असाल तर तीन वर्षापेक्षा अधिक काळ असलेले बियाणे वापरणे टाळावे. चांगल्या दर्जाचे तीन वर्षापेक्षा कमी कालावधीतील बीयाणे वापरल्यास दर्जेदार उत्पादन मिळते.
खत व्यवस्थापन - मुगाच्या पिकातून दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी शेणखताचा प्रभावी वापर करणे महत्त्वाचे ठरणार आहे. पूर्वमशागत करताना किंवा पूर्वमशागत झाल्यानंतरहेक्टरी 15 ते 20 गाड्या जुने कुजलेले शेणखत वापरण्याचा सल्ला दिला जातो.
लागवडीच्या वेळी हेक्टरी 20 किलो नत्र, 36 ते 40 किलो स्फूरद या पिकासाठी उत्तम असल्याचे सांगितले जाते. जेव्हा मुगाचे पीक फुलोऱ्यात येते तेव्हा युरियाची फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो. शेंगा बहरत असताना डीएपीची फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो. कुठल्याही खताचा वापर करण्यापूर्वी तसेच फवारणी करण्यापूर्वी कृषी वैज्ञानिकांचा सल्ला घेणे अपरिहार्य ठरणार आहे.
Share your comments