
Train News
पालघर : विरार – डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण व रेल्वे कारशेड बांधण्यासाठी प्रकल्पामधील सर्व्हे न. २१६ आसनगाव येथील कुटुंबे बाधित होत आहेत. यामधील बाधितांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे. याबाबत जिल्हा स्तरावर बैठक आयोजित करुन त्याचा अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
विरार – डहाणू येथील बाधित कुटुंबासोबतच इतर विषयांसंबंधात मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आदेश दिले. बैठकीला आमदार मनिषा चौधरी, ठाणे आणि पालघरचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, रेल्वेसाठी जमीन अधिग्रहीत केली जात असताना त्याठिकाणाच्या लोकांचे पुनर्वसन झाले पाहिजे. जर त्यांची घरे तिथे असतील तर त्याचा सर्व्हे करुन त्याचा योग्य मोबदला त्यांना मिळाला पाहिजे. जवळपास त्यांचे पुनर्वसन करता येईल का याचाही विचार होणे आवश्यक आहे. यासाठी नागपूरच्या मिहान प्रकल्पामध्ये ज्या पद्धतीने धोरण ठरविण्यात आले, त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.
समुद्र किनाऱ्यावर मच्छिमारांचा प्राधान्याने विचार
समुद्राच्या किनाऱ्यावर मच्छिमार समाजासाठी राखीव असलेली जागा गावठाणात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाबाबतही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मच्छिमारांची सध्याची जागा ही सीआरझेडमध्ये येत असून समुद्राच्या किनारी गावठाण करणे शक्य नाही. यासाठी जवळपास जागा पाहून त्याठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच जास्तीत जास्त मोबदला कसा देता येईल याबाबतही विचार करू असे स्पष्ट केले.
Share your comments