रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आणि डॉक्टर यांचे कौतुक केले. अल्पशा प्रमाणात लॉकडाऊन चालू असणार असून काही सुविधा चालू करत असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. एक तारखेला राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे तसेच वसंतराव नाईक यांची जयंती देखील आहे. हा आठवडा शेतकरी सप्ताह म्हणून साजरा करु. शेतकरी आणि डॉक्टरांसाठी हा दिवस साजरा करुन त्यांना सलाम करुयात, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. एक जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे आणि त्याच दिवशी शेतकरी दिन आहे जो आपले माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मरणार्थ साजरा करतो. त्यांना अभिवादन करुन शेतकर्यांना, अन्नदात्याला सलाम करतो, धन्यवाद देतो. आपल्यासाठी लढणार्या सर्व डॉक्टर्सचा दिवस आहे. मी त्यांना धन्यवाद देतो व आपण त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहु असे वचन देतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी त्यांनी सोयाबीन बियाणांविषयीही प्रतिक्रिया दिली. बोगस बियाणांच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, शेतकरी अपार कष्ट करुन बियाणे पेरतो आणि ते उगवत नाही. ज्यांनी शेतकऱ्यांना फसवले त्यांच्यावर कारवाई होणार. ज्यांनी शेतकऱ्यांना फसवले त्यांच्याकडून वसूली करुन नुकसानभरपाई देणार असल्याचे ठाकरे म्हणाले. शेतकरी मरमर राबून, अफाट मेहनत करून अन्न पिकवतोय आपल्यासाठी. त्या संदर्भात बी - बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी येणे हे दुर्दैवी. मेहनत करून पीक आले नाही तर काय करणार? मी शेतकरी दादाला सांगतो, काळजी करू नका, असंही ते म्हणाले.
काय आहे बियाणे प्रकरण -
महाबीज मार्फत वितरित करण्यात आलेले सोयाबीन बियाणे हे सदोष निघाल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. नित्कृष्ट प्रतीच्या सोयाबीन बियाणांमुळे मोठय़ा क्षेत्रातील पेरणी वाया गेली. दरम्यान मागील वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत परतीचा पाऊस मोठय़ा प्रमाणात झाला. त्यामुळे सोयाबीनचे दर्जेदार बियाणे तयार झाले नाही. परिणामी सोयाबीनच्या बियाणाचा तुटवडा निर्माण झाला. जी बियाणे उपलब्ध होती ते सर्व निकृष्ट निघाली आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याचे आश्वसन दिले आहे. हे बियाणे शेतकरी तयार करत असतात. नगर व बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी बियाणे तयार करतात. बियाणे निर्मितीत महाबीजचा ३० टक्के वाटा आहे. महाबीजसह राज्यात पन्नास बियाणे कंपन्या सोयाबीन बियाणाची विक्री करतात. दरम्यान किसान सभा द्वारे दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Share your comments