मुंबई APMC भाजीपाला बाजारपेठेच्या खत प्रकल्पातील पडीक जागेत सुरु असलेल्या गैरधंद्यांवर तसेच अमली पदार्थ विकणाऱ्या पान टपरीवर आज कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका आणि बाजार समिती प्रशासनाने हि संयुक्तरित्या कारवाई केली. भाजीपाला बाजारातील गेट नं ७ जवळील पान टपरी पोकलॅन मशीनद्वारे उचलून फेकून देण्यात आली. या पान टपरीत अमली पदार्थ विकले जात असल्याने यापूर्वी देखील पोलिसांनी कारवाई केली होती. शिवाय कारवाई करण्यात आलेला खत प्रकल्प गेली अनेक वर्ष वापराविना पडून होता. या प्रकल्पाचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आल्यापासून हि जागा पडीक राहिली होती.
या परिसरातील गैरप्रकार थांबावेत याकरिता गेट क्रमांक ७ बंद करून त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. तरी सुद्धा या ठिकाणी उपद्रवी नागरिकांकडून नशेल्या पदार्थांची विक्री आणि या जागेचा गैरवापर होत होता. त्यामुळे हि कडक कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तर भाजीपाला बाजारातील पान टपऱ्या, अवैध खाद्यपदार्थ विक्रेते, कंटेनरमधील कार्यालय तसेच भाजीपाला बाजारात सुरु असलेल्या इतर अवैध व्यापारावर देखील कारवाई करण्यात येणार आहे.भाजीपाला बाजारपेठेच्या ७ नंबर गेट वरून भाजीपाला बाजाराशी निगडित सर्व घटकांची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरु असते. यावेळी सुरु असलेल्या या गैरप्रकारांमुळे बाजार घटकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. शिवाय चोरीच्या प्रमाणात वाढ होऊन रस्त्यात लूटमार होण्याची भीती निर्माण झाली होती.
त्यामुळे काही व्यापाऱ्यांसह बाजार घटकांनी याबाबत बाजार समिती आणि महापालिकेकडे तक्रार केली होती. याची दखल घेत महापालिका आणि बाजार समिती प्रशासनाने हि कारवाई केली.
Share your comments