अमरावती : राज्यातील अनेक जिल्ह्यात खतांचा तुटवडा जाणवत आहे. पीकांच्या वाढीसाठी युरिया हे खत पिकांना दिले जाते, पण गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना खते मिळत नाहीत. यामुळे शेतकरी वर्गात नाराजी दिसून येत आहे, दरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील कृषी विभाग याची दखल घेत असून पुरेसा खत पुरवठा जिल्ह्यात करत आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यातही युरियाची टंचाई झाली होती. युरियाची पुर्तता व्हावी यासाठी राज्याच्या महिला व बालविकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी प्रयत्न केले.
यशोमती ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. इफको, आरसीएफ आदी विविध कंपन्यांमार्फत युरिया बडनेरा, धामणगाव रेल्वे येथील रेल्वे रेक पॉईंटवर पोहचला आहे. पुढील आठ दिवसात विविध कंपन्यांच्या सहा हजार 350 मेट्रीक टन युरियाचा पुरवठा सर्व तालुक्यात केला जाणार आहे. आरसीएफमार्फत एक हजार 300 मेट्रीक टन युरिया बडनेरा येथे पोहचला असून इफकोमार्फत एक हजार 550 मेट्रीक टन युरिया धामणगाव रेल्वे येथे उद्या पोहचत आहे. युरियाचे जिल्ह्यात सर्वदूर गतीने वितरण होण्यासाठी कृषी विभागाने काटेकोर नियोजन करुन सगळीकडे युरिया उपलब्ध ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.
रासायनिक खतांची विक्री इलेक्ट्रॉनिक मशिनद्वारे करणे बंधनकारक असून शेतकरी बांधवांनी कापूस, ज्वारी, मका व फळबागांच्या क्षेत्रानुसार आवश्यक युरियाची खरेदी करताना पीक पेरा क्षेत्र व आधार कार्ड सोबत ठेवावे. तसेच पीओएस मशीन वरुन युरियाची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात युरिया उपलब्ध होत असल्याने कापूस, ज्वारी, मका व फळबागा यांच्या क्षेत्रानुसार आवश्यक तेवढाच युरिया खरेदी करावा व विक्री केंद्रावर अनावश्यक गर्दी टाळून आरोग्याची काळजी घ्यावी. आवश्यक दस्तऐवज सोबत ठेवावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
Share your comments