State Cabinet meeting : दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारची आज (दि.३) मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीसाठी राज्यातील सर्व मंत्री उपस्थित होते.
पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल अशा ४ वस्तू होत्या. मात्र आता यामध्ये दोन वस्तुंची आता भर पडली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड होणार आहे.
राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी अशा १ कोटी ६६ लाख ७१ हजार ४८० शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल.
दरम्यान, यात १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा राहील. हा आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत वितरित करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ५३० कोटी १९ लाख इतक्या खर्चास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे.
Share your comments