प्रतिनिधी -आनंद ढोणे पाटील
छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एका शेतकरी दाम्पत्याने एकसाथ गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघकीस आली आहे. शेतीमुळे आर्थिक विवंचनेत येऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. या दाम्पत्याने त्यांच्या दीड वर्षांच्या चिमुकलीसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी येथील तरुण शेतकरी राजू दामोधर खंडागळे (वय २८ वर्ष) आणि त्याची पत्नी अर्चना राजू खंडागळे (वय २६) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड या समस्येमुळे दोन एकर शेती तोट्यात आली. तसंच आर्थिक समस्या निर्माण झाल्या त्यामुळे दोघांनी विचाराअंती शुक्रवार (दि.२८) रोजी सायंकाळच्या वेळी आत्महत्या केली.
आत्महत्याग्रस्त मयत शेतकरी दाम्पत्याने यंदा पावसाच्या खंडामुळे दुबार पेरणी केली होती. तर मागील वर्षी अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक वाया गेले होते. अवघ्या दोन एकरात पोट भरत नसल्याने खंडागळे यांनी काही जमीन बटाव केली होती.परंतु निसर्गाच्या अवकृपेने शेतीत खर्च करुनही ती परवडत नव्हती. यात ते पूर्णपणे कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.
शुक्रवारी सायंकाळी राजू खंडागळे व त्यांच्या पत्नी अर्चना दोघेही पती-पत्नी शेतात गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगीही होती. विशेष म्हणजे सायंकाळी शेतात गेल्याने राजू यांना वडिलांनीही फोन लावून विचारणा केली होती. त्यावर शेतातून निघत असल्याचे राजू यांनी सांगितले. मात्र, त्यानंतरही बराच वेळ होऊन देखील हे दाम्पत्य घरी आले नाही. त्यामुळे वडिलांनी पुन्हा फोन लावला. तेव्हा ते फोन उचलत नसल्याने कुटुंबातील सदस्य शेतात गेले. यावेळी राजू आणि अर्चना दोघेही झाडाला गळफास घेतेलेल्या अवस्थेत आढळून आले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच 'बीआरएस'चे किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी खंडागळे कुटुंबाची भेट सांत्वन केले आहे. तसेच महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या समस्येवर उपाययोजना करीत नसल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.
Share your comments