पिंपळगाव बाजार समिती मधून शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पिंपळगाव बाजार समितीमध्ये नेहमीच व्यापारी आणि शेतकरी यांच्यात व्यवहारावरून मतभेद बघायला मिळतात. हा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून ऐरणीवर आहे. अनेकदा यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांच्यामधला वाद अगदी टोकाला जाऊन पोहचतो आणि शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये हाणामारी सारख्या घटना देखील बघायला मिळतात. शेतमाल खरेदी करताना होत असलेला गैरव्यवहार मोजणी करताना मापात पाप होत असल्याचा आरोप तसेच शेतमालाची होत असलेली नासाडी यासारख्या असंख्य मुद्द्यांवरून शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये संघर्ष कायमच बघायला मिळतो.
मात्र आता पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने या सर्व समस्यांवर एक रामबाण उपाय शोधून काढला आहे. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने आता शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन व बाजार समिती प्रशासनातील तसेच व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी लिलाव सीसीटीव्हीच्या अखत्यारीत करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थातच आता सीसीटीव्हीच्या निगराणी मध्ये बाजार समितीत लिलावाची प्रक्रिया पार पडणार आहे.
याआदी पणन महासंघाने बाजार समितीत इलेक्ट्रिक वजन काटे बसवण्याची सक्ती केली होती या अनुषंगाने बाजार समितीत इलेक्ट्रिक वजन काटे बसवले गेले मात्र आता पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने खुद्द दखल घेत शेतकऱ्यांच्या भावना ओळखून तसेच व्यवहारात तसेच लिलावात पारदर्शकता आणण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, बाजार समिती प्रशासन या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी देखील करणार आहे यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना न्याय मिळणार असून बाजारसमितीत होणारा गैरव्यवहार टाळला जाणार आहे.
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी शेतकरी बांधव घेऊन जातात. या बाजार समितीत कांदा समवेतच इतर अनेक शेतमाल विक्रीसाठी येत असतो. मात्र, शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये नेहमीच वजन काट्यावरून वाद होतो. शेतकरी बांधव व्यापाऱ्यांवर मापात पाप करण्याचा आरोप करीत असतात. यामुळे वाद शिगेला पोहोचतो. अनेक प्रकरणात व्यापारी दोषी असल्याचे देखील सिद्ध झाले आहे, यामुळे याचा सरळ फटका शेतकर्यांना बसत असतो.
त्यामुळे व्यापाऱ्यांच्या अनैतिकतेला चाप दिला जावा या हेतूने पिंपळगाव एपीएमसीने सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे आणि आगामी काही दिवसात पिंपळगाव एपीएमसीमध्ये आता सीसीटीव्हीच्या निगराणीत लिलाव पार पडणार असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे याबाबत बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
Share your comments