राज्यात २१ एप्रिलपर्यंत झालेल्या एकूण कोरोना चाचण्यांपैकी ९४.१५ टक्के चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाच्या ताज्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. मुंबई-पुण्यासह राज्यात रुग्णांची संख्या वाढत असताना या अहवालातील हे निष्कर्ष काहीसे दिलासादायक ठरले आहेत. ९ मार्च रोजी राज्यात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र याचदरम्यान चाचण्यांचे प्रमाणही वाढले असून आता राज्यात दररोज ७ हजारपेक्षाही अधिक चाचण्या घेण्यात येत आहेत.
दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६ हजार ४२७ असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, काल राज्यात १४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. झालेल्या मृत्यूपैकी सहा जण मुंबईचे तर पुण्याचे पाच तर नवी मुंबई, नंदूरबार आणि धुळे मनपा येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू आहे. राज्यात आतापर्यंत २८३ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९६ हजार ३६९ नमुन्यांपैकी ८९ हजार ५६१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर ६४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १४ हजार ३९८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८७०२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. मुंबई-पुण्यासह राज्यात रुग्णांची संख्या वाढत असताना या अहवालातील हे निष्कर्ष काहीसे दिलासादायक ठरले आहेत, अशी माहिती काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ४७७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण ७४९१ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी २७.२६ लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.
Share your comments