जनावरांसाठी अत्यंत घातक, संसर्गजन्य रोग असलेल्या लाळ्या खुरकूत आजारावर लसीकरणाद्वारे नियंत्रण मिळवता येते. सिन्नर तालुक्यात याचा झालेला प्रादुर्भाव पाहता राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. 1 सप्टेंबरपासून सुरू झालेली ही मोहीम 15 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. मोहिमेअंतर्गत गाय, म्हशींना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 82 हजार डोस उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले.
लाळ्या खुरकूत रोग जनावरांच्या खुरांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो. या विषाणूजन्य रोगाची जनावराच्या शरीरात लागण झाली की उच्च तापमान तसेच तोंड, सड, खुरामधुन स्त्राव येत राहतो. त्याच्यावर लसीकरण द्वारे नियंत्रण मिळवता येते. रोगामुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी पशुपालकांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन उपसभापती संग्राम कातकाडे यांनी यावेळी केले. मोहिमेस पशुपालकांनी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार राहुल कोताडे यांनी केले.
लाळ खुरकत आजार हा विषाणूजन्य आजार असून त्यामुळे जनावरांना ताप येणे, पायाची जखम होणे, तोंड येणे, गाभण जनावरांचा गर्भपात होणे, दूध उत्पादनात घट होणे इत्यादी दुष्परिणाम दिसून येतात. लसीकरण मोहिमेअंतर्गत जनावरांच्या कानांना बिल्ले देण्यात येणार असून त्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात येणार आहे. टोचलेले बिल्ले कायम ठेवण्यात येणार असून त्याआधारे जनावरांची खरेदी-विक्री, विमा, उपचारांसाठी उपयोगी ठरणार आहे, अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. भांगे यांनी दिली.
Share your comments